रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपाचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची भाजपा सरकारच्या करंटेपणामुळे दुरवस्था-हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, माजी आमदार मोकल, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, प्रदेश उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदर सिंग बच्छर, शशांक बावचकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिपळूणमधील शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, निवडणुकीत जय पराजय होत असतात, पराभवाने खचून न जाता काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या. तालुका, जिल्हा, ब्लॉक, वार्ड, बुथ स्तरावर संघटना मजबूत करा व आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हात मजबूत करा. काँग्रेसचा शिपाई म्हणून लढा, काँग्रेस पक्षाला नक्की गतवैभव प्राप्त होतील असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

शिबिरानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चिपळूणमधील शिबिरातून नेतृत्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिराने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल. आघाडीचे राजकारण ही अपरिहार्यता आहे पण त्याचा कोकणात काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे. आगामी काळात कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच अनुषंगाने कोकण विभागात हे तीन दिवसाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल असे सपकाळ म्हणाले.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. मुख्यमंत्री व मंत्र्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे स्मारक करण्याच्या घोषणा अनेकवेळा केल्या पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, हे भाजपा महायुती सरकारच्या करंटेपणाचे लक्षण आहे. संभाजी महाराज यांचे स्मारक न करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशाची भिती वाटत आहे, संभाजी महाराजांच्या स्मारकामुळे मुख्यमंत्र्यांच्या ‘विचारांना’ अडचण होईल, अशी भिती तर त्यांना वाटत नाही ना, असा खोचक सवालही यावेळी केला.

लक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध..

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणात येणारा लक्ष्मी ऑरगॅनिक्स या इटली मधील घातक प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. इटलीमध्ये बंद पडलेल्या या केमिकल कंपनीचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे कोकणातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्ष हा प्रश्न विधिमंडळातही उपस्थित करणार आहे व कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असे स्पष्ट करताना, कोकणातील मंत्री या प्रकल्पाविरोधात आवाज का उठवत नाहीत. दररोज हिंदु-मुस्लीम वाद उभा करण्यासाठी तोंड उघडणारे मंत्री लक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रकल्पाबाबत गप्प का आहेत, अशी विचारणाही केली.

आमदार भाई जगताप म्हणाले की, तीन दिवसाच्या शिबिरात विचाराचे आदान प्रदान झाले. या शिबिराने कार्यकर्त्यांना मोठी उर्जा मिळाली. साचेबद्ध न राहता वेगळ्या धाटणीचे शिबिर झाले ही काळाची गरज आहे. अशा प्रकारची शिबिरे राज्यातील इतर भागात झाली पाहिजेत. या शिबिरातून विचाराची शिदोरी मिळाली. भाजपा व काँग्रेस यांची आयडिया ऑफ इंडिया भिन्न आहे. जे लोक स्वातंत्र्य संग्रामात भागही घेतला नाही ते लोक आज सत्तेवर आहेत.आपल्याला काँग्रेसची आयडिया ऑफ इंडिया पुढे घेऊन जायची आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत एका महान व्यक्तीने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ब्रिटिश सत्तेविरोधात लढा दिला ते म्हणजे महात्मा गांधी आणि आज देशातील जुलुमी सत्तेच्या विरोधात मोठ्या निर्धाराने लढा देणारे नेते आहेत राहुल गांधी. काँग्रेसचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. या शिबिरातून जा विचार मिळाला त्या मार्गाने वाटचाल करा असेही सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी चिपळूण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा स्मारकाला भेट दिली. यावेळी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून युगात्मा हे मंगेश पाडगावकर यांनी संपादित केलेले दुर्मिळ पुस्तक भेट दिले. यावेळी श्री ग्रामदेव जुना काळभैरव मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या श्री भवानी देवीचे दर्शन घेतले.

छत्रपती संभाजी महाराज यांनी वास्तव्य केले , त्या पवित्र वाड्याला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, नुरुद्दीन सय्यद आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार

राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *