राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून भाजपा मोठे आकांड तांडव केले. तसेच नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचेही वेळावेळी जाहिर केले. मात्र काल विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांनी मिरवणूकीने जात शिवजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार पक्षाने दिलेला एबी फॉर्मही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध कायम आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबधित व्यक्ती सोबत त्यांचे नाव जोडले गेले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी जरी उमेदवारी अर्ज भरलेला असला तरी भाजपाकडून त्यांचा प्रचार केला जाणार नाही की त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, अनुशक्ती नगर मधून सना मलिक-शेख यांच्या उमेदवारीबाबत कोणतीही अडचण नाही. त्या महायुतीच्या उमेदवार असल्याचे यावेळी सांगितले.
तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध कायम आहे. त्यांनी जरी उमेदवारी अर्ज भरलेला असला तरी भाजपा त्यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले.
यासंदर्भात शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की, मी अजित पवार यांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. त्यामुळे कोण काय माझ्या उमेदवारी बद्दल बोलतय याच्याशी माझे देणे-घेणे नाही असे सांगत भाजपाच्या विरोधाला काढीचीही किंमत देत नसल्याचे अप्रत्यक्ष सांगितले.
Marathi e-Batmya