नवाब मलिक यांचा दावा, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची पॉलिटिकल अडजेस्टमेंट ;शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम...

राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही. वेळेनुसार सर्व बदलत असतात. २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का. मात्र वेगळे घडले त्यामुळे २३ नोव्हेंबरला निकाल आला की, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले की, आमचा नेता हा किंगमेकर आहे. परंतु राजकारणात सर्व नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. परंतु आज आमची इतकी ताकद नाही की, आम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी दावा करु शकतो. परंतु आम्ही किंगमेकर बनणार आणि आम्हीच ठरवणार सरकार कसे बनवायचे आणि कुणाचे बनवायचे असा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली हे खरेच आहे. राजकारणात मधु कोडा एक आमदार मुख्यमंत्री बनू शकतो तर अजित पवार महाराष्ट्रातील एक मोठी ताकद आहे. निवडणूक निकालानंतर बघू मात्र आमच्याशिवाय कोणच सरकार बनवू शकत नाही असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीच्यावतीने सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर अंगुलीनिर्देश केले जात आहे की, हे भाजपासोबत आहे. परंतु आमचे हे ‘पॉलिटिकल अडजेस्टमेंट’ आहे हे वारंवार अजितदादाने स्पष्ट केले आहे. आम्ही आमची विचारधारा सोडू शकत नाही. धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक व्यवस्था आम्हाला हवी आहे. आम्ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारधारेसोबत जोडलेले आहोत. परंतु जे लोक भाजपासोबत असल्याचा कांगावा करत आहेत त्यांना माझा सवाल आहे. महाराष्ट्रात मविआचे घटक पक्ष असलेले उध्दव ठाकरे कालपर्यंत भाजपासोबत होते की नाही… पवारसाहेब १९७८ पासून १९८७ पर्यंत पुलोदचा फार्मुला मुख्यमंत्री बनण्यापासून ते निवडणूक लढवण्यापर्यंत भाजपासोबत पॉलिटिकल अडजेस्टमेंट केली होती की नाही…ममता बॅनर्जी भाजपासोबत होत्या की नाही…देशात जनता दलाचे सरकार होते आणि राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली गेली त्यावेळी समाजवादी पक्षाचे सर्व नेते जनता दलात होते त्यावेळी भाजपासोबत राहून उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली गेली की नाही… मुलायमसिंग यादव यांनी भाजपाचे समर्थन मिळवून मुख्यमंत्री बनले की नाही… मायावती भाजपासोबत होत्या की नाही… लालूप्रसाद यादव यांचे समर्थन बिहारमध्ये भाजपाने केले होते की नाही… त्यामुळे मला वाटते वेळेनुसार पॉलिटिकल अडजेस्टमेंट राजकीय पक्ष करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसनेसुध्दा पॉलिटिकल अडजेस्टमेंट केले आहे. परंतु वैचारिक विचारधारा आहे ती कदापि सोडणार नाही. सरकार नक्की येईल आम्ही किंगमेकर ठरणार आहोत मात्र आमच्या अटीवर येणारे सरकार बनेल असा विश्वास व्यक्त करतानाच आम्ही भाजपाच्या अजेंड्यावर डोळे झाकून राहणारे लोक नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

ज्या लोकांना वाटत होते नवाब मलिक हे राजकारणातून संपले पाहिजे हा भ्रम होता ;

ज्या लोकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे असे लोक माझा जामीन रद्द करुन पुन्हा एकदा मला जेलमध्ये टाकण्याच्या प्रयत्नात आहेत असा थेट हल्लाबोल नवाब मलिक यांनी यावेळी केला.

सर्वोच्च न्यायालयाने मला जामीन दिला आहे आणि शेवटचा आदेश दिला आहे त्यात जोपर्यंत हायकोर्ट माझ्या जामीनावर निर्णय घेत नाही तोपर्यंत हा जामीन कायम राहणार आहे. त्यात माझ्यावर मिडियासोबत बोलण्याची बंदी होती त्याबाबत न्यायालयाकडून संबंधित केससंदर्भात मिडियासोबत बोलणार नाही अशी परवानगी घेतली आहे. राजकीय विषयावर किंवा इतर कोणत्याही विषयावर बोलायला मला बंदी नाही. ज्याप्रकारे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका म्हणजे मला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला मी घाबरणार नाही. याच्या पाठीमागे कोण आहे याचा चेहरा आज ना उद्या समोर येणारच आहे. मात्र महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनता हे सर्व जाणते की, कोणत्या लोकांना माझ्यामुळे राजकारणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांची नावे लवकरच पुढे येतील. परंतु मी जेलमध्ये जायला घाबरत नाही. माझ्या बोलण्यावर मी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यावर ज्या अटी घातल्या होत्या त्या अटींचे मी कधीच उल्लंघन करणार नाही असे स्पष्ट करतानाच मुंबईच्या बाहेर तीन दिवसापेक्षा जास्त दिवस बाहेर जायचे असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तीन दिवसापेक्षा कमी असेल तर त्याची माहिती कोर्टाला द्यायची आहे. मी या सगळ्या गोष्टींचे पालन करत आहे. मात्र ज्या लोकांना मला निवडणूकीतून बाहेर जावे यासाठी किंवा मला बोलण्यापासून रोखण्यासाठी व्यक्तीगत विरोध करणारे लोक असा प्रयत्न करत आहेत. मात्र माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. याचिका रद्द करायची की नाही याचे अधिकार कोर्टाला आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *