जरा मदत करा, माझ्या जावयाला भाजपात पाठवतोय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाजप मंत्र्याला साकडे

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे वारे वाह्यला सुरुवात झाली असून या वाऱ्यात स्वत:चे, नातेवाईकांचे आणि आप्तस्वकीयांचे राजकिय भवितव्य ठरविण्याची चढाओढ प्रत्येक राजकिय पक्षातील नेत्याकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वजनदार नेत्याने आपल्या कुलाबा येथे राहणाऱ्या आमदार जावयासाठी भाजपच्या मंत्र्याकडे शब्द टाकत जावई भाजपमध्ये पाठवित असून त्याला मदत करण्याचे साकडे घातल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटउडी मारण्याचे प्रकार सातत्याने सुरुच असतात. नेमक्या याच कालावधीत निवडणूकीनंतर सत्तेत येणाऱ्या पक्षात जाण्यासाठी प्रत्येक राजकारण्यांची धडपड सुरु असते. त्या अनुषंगाने केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी भाजपच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांची मोठ्या प्रमाणावर मोट बांधली जात आहे. याकामी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रणनीती असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र याच पक्षाच्या एका वजनदार नेत्याने स्वत:च्या विधान परिषदेत आमदार असलेल्या जावयासाठी भाजप प्रवेश निश्चित केला असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूकीच्या ऐन धामधुमित या जावयाचा भाजप प्रवेश होणार असून प्रवेशानंतर सदर आमदार जावयास मदत करावी अशी इच्छा या वजनदार नेत्याची आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील भाजप मंत्र्यांना आमदार जावयास मदत करण्याचे साकडे या वजनदार नेत्याकडून सांगण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील आठवड्यात विधानभवनात एका विषयावर बैठक बोलावली होती. त्यावेळी प्रशासकिय अधिकाऱ्यांबरोबरच काही मंत्रीही उपस्थित होते. बैठकीनंतर सदर मंत्र्यांसोबत झालेल्या स्वतंत्र बैठकीत सदर वजनदार नेत्याने जावयाला भविष्यात राजकिय प्रवाहात टिकवून ठेवायचे आहे. त्यामुळे तुमच्या पक्षात आल्यानंतर त्याला मदत करा असे साकडेही या मंत्र्याना घातल्याचे त्यांनी सांगितले.

यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनाच त्यांचा पक्ष सत्तेत येणार नसल्याचा अंदाज आला असल्याचे सांगत भाजपमध्ये जाणाऱ्यांची सर्वात जास्त संख्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील असल्याचेही त्यांनी सांगितले.   

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *