Breaking News

सचिन वाझे यांचे नवे आरोप, अनिल देशमुख म्हणाले ही तर फडणवीसांची चाल पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांच्यापर्यंत सदर वृत्तसंस्थेचा प्रतिनिधी पोहोचलाच कसा

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सरकारच्या काळातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या प्रश्नावरून सातत्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनीही या वादात उडी घेत भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून अनिल देशमुख यांना अडकविण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीचे सगळे रेक़ॉर्डींग आपल्याकडे असल्याचा दावा केला. त्यावरून या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत वाढच झाली.

या सगळ्या घडामोडीत याप्रकरणातील प्रमुख आरोपी तथा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांने आणि आज पोलिसांच्या ताब्यात असतानाही एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही नाव घेतले. त्यामुळे एकच राजकिय खळबळ उडाली आहे.

सचिन वाझे यांना पोलिस बंदोबस्तात नेण्यात येत होते त्यावेळी एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने सचिन वाझे यांना सवाल केला की, अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे षढयंत्र रचल्याचा आरोप केला. त्यावर सचिन वाझे म्हणाले की, अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत. तसेच यासंदर्भात मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. हे सर्व प्रकरण अनिल देशमुख यांच्या विरोधात गेलं आहे. तसेच मी नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचेही नाव आहे असा गौप्यस्फोटही केला.

सचिन वाझे यांच्या या आरोपानंतर अनिल देशमुख म्हणाले की, चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले आणि जी वस्तुस्थिती समोर आणली, आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावं यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता, ही गोष्ट ज्यावेळी मी जनतेच्या समोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझे याने माझ्यावर जे आरोप केले ती देवेंद्र फडणवीस यांचीच नवी चाल असल्याचा प्रत्यारोपही यावेळी केला.

दरम्यान, ज्या वृत्तसंस्थेकडून पोलिस बंदोबस्तात सचिन वाझे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून एक वेगळाच संशय निर्माण होत आहे. सदर वृत्तसंस्थेचे भाजपाशी वार्षिक करार असल्याचे दिसून येत असून सरकारच्या बाजूची माहिती आणि सरकारी कार्यक्रमाचे व्हिडिओही याच संस्थेच्या माध्यमातून दाखविण्यात येतात. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाला वेगळाच वास येत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *