मतदानाच्या दिवशीच महायुती आणि महाविकास आघाडीत आघाडी धर्माची ऐशीतैशी राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी काँग्रेसचा उबाठाला, तर मनसेला भाजपाचा पाठिंबा

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी आज मतदानाला सकाळी सुरूवात झाली. मात्र मतदानाला नुकतीच सुरुवात झाल्यानंतर ज्या विधानसभा जागेवर ज्या पक्षाने दावा केला. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षाने त्याच जागेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या पक्षाच्या उमेदवारालाच अपक्ष किंवा तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय त्याच उमेदवाराच्या पारड्यात मतदान टाकल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोघांकडूनही सोयीने आघाडी धर्माची एैशीतैशी केल्याचे दिसून येत आहे.

सोलापूरात शहर दक्षिण मध्ये जवळपास १७-१८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत ही जागा काँग्रेसला सुटली. परंतु या जागेवर शिवसेना उबाठा गटाकडून यापूर्वीच उमेदवार जाहिर करण्यात आला होता. नंतर हा मतदारसंघ काँग्रेसच्या उमेदवारासाठी सोडण्यात आला. हीच अवस्था पंढरपूर विधानसभा मतदारसंघातही. त्यामुळे एकाच मतदारसंघात मतांचे विभाजन नको म्हणून महाविकास आघाडीतील दोन उमेदवारांपैकी एकाने माघार घ्यायचा निर्णय घेतला. त्यानुसार कोणत्या पक्षाचा उमेदवार ठेवायचा आणि कोणत्या पक्षाचा उमेदवाराने अर्ज ठेवायचा याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार सोलापूर दक्षित विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दिलीप माने यांचा भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितले. तर दुसऱ्याबाजूने काँग्रेसकडूनच अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. त्याचबरोबर शिवसेना उबाठाचे उमेदवार अमर पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. मतदानाच्या दिवशी मात्र माजी खासदार सुशिलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे उमेदवार अमर पाटील यांना पाठबळ देण्याऐवजी काँग्रेस पुरस्कृत धर्मराज काडादी यांच्या मागे समर्थन उभे केले. त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या मतदानाची विभागणी झाल्याचे चित्र निर्माण झाले. यासंदर्भात प्रणिती शिंदे यांच्याशी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्या म्हणाले की, पंढरपूरात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. आम्ही दक्षिण विधानसभा मतदारसंघातही मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती. मात्र पक्षाच्या बैठकीत ती जागा शिवसेना उबाठाला सोडण्याचा निर्णय झाला. मात्र काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आणि आग्रह लक्षात घेता काँग्रेसने अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

तर मुंबईत दादर-माहिम विधानसभा मतदारसंघात महायुतीत बेबनाव झाल्याचे दिसून येत होते. दादर-माहिम विधानसभा मतदारसंघ हा मागील दोन टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. पूर्वी संयुक्त शिवसेनेच्या तर आता शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे हे ही या मतदारसंघातून लढत असल्याने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावा असा आग्रह भाजपा आणि शिवसेना शिदे गटाने आपल्याच उमेदवाराकडे धरला होता. मात्र सदा सरवणकर शिवसेना उबाठाच्या उमेदवाराची भीती दाखवत निवडणूकीतून माघार घेण्यास नकार देत होते. मात्र आज मतदानाच्या दिवशी भाजपाने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचाराऐवजी मनसेचे अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले.

प्रथमदर्शनी या दोन मतदारसंघातील वानगी दाखल उदाहरणे पुढे आली आहेत. या दोन मतदारसंघाबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक मतदारसंघात अशाच प्रकारची थोड्या बहुत फरकाने अशीच परिस्थिती आपापल्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आघाडी धर्माचे पालन ना भाजपा प्रणित महायुतीने ना राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीने पाळला असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मताचं विभाजन टाळत ज्या मतदारसंघात एकमेकांना मदत केली असे मतदारसंघही अनेक आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी किती जागांवर विजयी होणार कोणत्या जागा मैत्रीपूर्ण लढतीतून वाचविणार याचा निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी आपणाला बघायला मिळणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *