आयुक्तांच्या बदलीसाठी देव पाण्यात ! सत्ताधारी भाजपाचे अपयश लपविण्यासाठी धडपड...

पनवेल : प्रतिनिधी

सत्ताधारी गटाचे औषधापुरतेही अस्तित्व जाणवू न देता प्रशासकीय निर्णय घेवून पनवेल महापालिकेच्या कारभाराला विकासाचे पंख जोडणारे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे राजकीयदृष्ट्या डोईजड झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी भाजपा नेतृत्वाने अक्षरशः देव पाण्यात बुडवले आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असलेले जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे बंधू असल्याची संधी साधत राज्य सरकारने त्यांची निवडणुकीच्या उंबरठय़ावर बदली केली होती. राजकीय दबावा विरोधात तेव्हा पनवेलकरांनी सुप्त आवाजात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पनवेल संघर्ष समितीने मुख्यमंत्री ते पंतप्रधान कार्यालयात पत्रव्यवहार करून ती बदली रद्द करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढविला होता. त्यानंतर डॉ. शिंदे पुन्हा आयुक्तपदी रुजू झाले.

दरम्यानच्या काळात आयुक्तांची बदली करण्यासाठी अग्रेसर राहिलेल्या भाजपा नेत्यांनी यू-टर्न घेतला. सगळीकडे नाचक्की झाल्याचे लक्षात येताच श्रेय घेण्यासाठी कागदी घोडेही पुढे सरकावले होते. आता पुन्हा डॉ. शिंदे यांच्या बदलीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार तक्रारींचा सपाटा स्थानिक भाजप नेत्यांनी लावला आहे.

प्रा. राम शिंदे यांच्या घराण्याचे संघ परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत. शिवाय राज्यातील मोजक्या प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांपैंकी डॉ. शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील एक अधिकारी आहेत. शिवाय फडणवीस यांच्या निर्देशानुसार पनवेल महापालिकेत डॉ. शिंदे अधिकार वापरून लोकप्रतिनिधींना वगळून प्रशासकीय निर्णय घेत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने सत्तेवर आलेले भाजपा नगरसेवक आयुक्तांच्या पारदर्शक कारभारापुढे झाकोळून गेले आहेत. त्यामुळे सशाचे काळीज घेवून सभागृहात आणि महापालिका क्षेत्रात वावरावे लागलेल्या सत्ताधारी गटावर नामुश्कीची वेळ ओढवली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने भाजपा नगरसेवकांत आयुक्तांविषयी नाराजीही वाढत चालली आहे.

डॉ. शिंदे यांचा वैचारिक आणि प्रशासकीय सामना करणे अवघड जात असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तगादा लावून बदलीचे प्रयत्न जोरदारपणे भाजप करीत आहे.

शेकाप नेते घेणार मुख्यमंत्र्यांनी भेट

डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेत्रुत्वाखालील महापालिकेचा प्रशासकीय कारभार उत्तमरित्या सुरू असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या बदलीचा भाजपाने पुन्हा घाट घातला आहे. त्यामुळे पनवेलच्या विकासालाही खिळ बसणार आहे. शिवाय चुकीचे सामाजिक संकेत जातील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून बदली रद्द करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जाणार असल्याचे माजी आमदार शेकाप नेते विवेक पाटील यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *