Breaking News

पंतप्रधान मोदींनी मुख्य सचिव सौनिक यांचे नाव घेत राज्य सरकारला लगावली चपराक महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण केंद्रालाही लाजवतय

मागील काही वर्षात महाराष्ट्रातील महिला विकास व नारी सशक्तीकरणाबाबत महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असून देशापेक्षा महाराष्ट्राचे काम जास्त चांगले असल्याचे सांगत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव घेत हा महिला अधिकारी चांगले काम करत असल्याचे वाढवण बंदरानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत राज्य सरकारकडून सुजाता सौनिक यांच्या बदलीसाठी सुरु असलेले प्रयत्नांना चपराक लगावली. त्यामुळे सुजाता सौनिक यांच्या बदलीला तूर्तास स्थगिती मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्यावर दबाव आणत हव्या मतदारसंघात नियम डावलत मतदान केंद्रे स्थापित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या एका प्रदेशाध्यक्षाने दबाव आणला. तसेच प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदलीची धमकीही देण्यात आली. या कामासाठी सदर सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फतही प्रयत्न केले. या विषयीचे वृत्त मराठी ई-बातम्या या संकेतस्थलावर यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आले.

त्यानंतर राज्याच्या पहिल्य़ा महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचीही बदली करण्याचा घाट राज्य सरकारकडून आखण्यात येत होता. तसेच सुजाता सौनिक यांच्या जागेवर गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु होत्या. तसेच सुजाता सौनिक यांना राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्याची चर्चाही राज्याच्या राजकिय आणि मंत्रालयीन वर्तूळात सुरु होती. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजाता सौनिक यांचे नाव घेत चांगले काम करत असल्याचे प्रशस्ती पत्रक दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची बदली टळणार की होणार या विषयी अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट होईल.

दरम्यान, पालघर येथे आयोजित वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील महिला सशक्तीकरण व महिला अधिकाऱ्यांचे जाहीर सभेत कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी अतिशय सक्षमपणे काम करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक या राज्यातील प्रशासनाला मार्गदर्शन करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला या नेतृत्व करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या वन संरक्षण बलाच्या प्रमुखपदी सौमिता बिश्वास नेतृत्व करत आहेत. राज्याच्या विधी विभागाच्या प्रमुख म्हणून सुवर्णा केवले या जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याच्या प्रधान अकाऊंटंट जनरल पदी जया भगत यांनी तर मुंबईतील कस्टम विभागाची धुरा प्राची स्वरूप सांभाळत आहेत. तर मेट्रो तीनचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे करत आहेत, असेही सांगितले.

तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातही महिला नेतृत्त्व करत असल्याचे सांगून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *