पंतप्रधान मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी ग्रामविकास खात्याकडून २ कोटींचा खर्च गर्दी जमवण्यासाठी ग्रामविकास खात्याचे लेखी आदेश असल्याचा धनंजय मुंडेचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी
राज्य दुष्काळात होरपळत असताना, तिजोरीत खडखडाट असताना आणि राज्य कर्जबाजारी झाले असताना शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमासाठी ग्रामविकास खाते करत असलेल्या दोन कोटी रूपयांची उधळपट्टी कशाला, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केला. मोदी लाट पूर्णपणे ओसरल्याने शासकीय खर्चाने माणसे आणण्याची वेळ सरकारवर आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शिर्डी येथे १९ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या ई-गृह प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहवे यासाठी ग्रामविकास विभागाने दोन कोटी रूपयांची अधिकृत तरतूद केली आहे. याबाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र धनंजय मुंडे यांनी ट्विट केले असून त्यात या संपूर्ण खर्चाची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ४० लाख लोक जमा करावेत यासाठी ८०० बस भाड्याने घेऊन माणसे आणण्यात येणार आहेत. येणार्‍या प्रत्येक माणसाला शंभर रूपयांचा नास्ता आणि १४ रूपयांचे ओळखपत्रही देण्यात येणार असून बसगाड्यांवर मोदी यांच्या फोटोची व कार्यक्रमाची जाहिरात असणार्‍या बॅनरसाठीही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शासकीय निधीतून होणार्‍या या खर्चाला धनंजय मुंडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारच्या कोणत्याच योजना जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे खोटा प्रकार करण्याचा धंदा सुरू आहे. आता निवडणुका जवळ आल्यामुळे शासकीय अनुदानाचा वापर खोटे बोलण्यासाठी केला जात आहे. मोदी यांची लाट आता उतरली आहे. गर्दी जमणार नाही या भीतीने गर्दी जमवण्यासाठी सरकार अधिकार्‍यांना लेखी आदेश देत आहेत. पंतप्रधानांना खूष करण्यासाठी गर्दी जमवण्यात सामान्य जनतेच्या घामाचे कररूपी जमा केलेल्या कोट्यवधी रूपयांचा सरकार चुराडा करत आहे. मुळात पंतप्रधान आवास योजना ही पूर्वीच्याच इंदिरा आवास योजना व इतर काही योजनांचे एकत्रिकरण करून करण्यात आली आहे. तीही निटपणे राबवली गेली नाही म्हणूनच लाभार्थी शोधण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *