शरद पवार म्हणाले, कोणत्याही राजकिय पक्षाने विषय प्रतिष्ठेचा न करता…

अंधेरी पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, ही निवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर आता राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले. तसेच कोणत्याही राजकिय पक्षांनी हा विषय प्रतिष्ठेचा न करता निवडणूक बिनविरोध करावी असे म्हणाले.

प्रत्येक पक्षाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली, त्यात तक्रार करण्याचे काहीही कारण नाही. रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके निवडणूक लढत आहेत. मुरजी पटेल यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मला प्रमाणणिकपणे वाटते, की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यामुळे एक चांगला संदेश देशभरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जो उमेदवार निवडून येईल, त्याला केवळ दीड वर्षाचा कार्यकाळ मिळेल. त्यापैकी शेवटचे सहा महिने हे आगामी निवडणूकीच्या धामधुमीत जातात. त्यामुळे प्रत्यक्षात जिंकून येणाऱ्या उमेदवाराला एक वर्षाचा कालावधी काम करायला मिळणार आहे. तसेच त्यानंतर पुन्हा निवडणुका होतील. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली होती. मुंडे यांच्या परिवारातील कोणी सदस्य उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढवणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असे मी म्हणालो होतो, या घटनेची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी या आवाहनाला उशीर झाला का? असे विचारले असता, ते म्हणाले, बाकी पक्ष करत आहेत म्हणून मी आवाहन करत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी हे आवाहन करतो आहे. अद्यापही निवडणूक अर्ज मागे घेण्याची तारीख बाकी आहे. त्यामुळे आम्ही हे आवाहन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *