प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का ? पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयांमुळे भारताची संरक्षण स्वायत्तता आणि सार्वभौमत्व धोक्यात

देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे भारताची संरक्षण स्वायत्तता आणि सार्वभौमत्व धोक्यात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

८ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या आपल्या विधानाचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनात झालेल्या विलंबाकडे लक्ष वेधले. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला अमेरिकन कंपनी GE Aerospace कडून इंजिन पुरवठ्यात तब्बल दोन वर्षांचा विलंब झाला. या विलंबामुळे तेजस प्रकल्पावर गंभीर परिणाम झाला असून, HAL ने GE एरोस्पेसवर दंडात्मक कारवाई केल्याचेही त्यांनी नमूद केले. ९९ इंजिनांच्या ऑर्डरपैकी आतापर्यंत केवळ ६ इंजिनांचीच डिलिव्हरी झाल्याची बाब अधोरेखित केल्याचे निदर्शनास आणून दिले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तसेच राफेल लढाऊ विमानांच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. फ्रान्सच्या Dassault Aviation निर्मित राफेलसाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या तांत्रिक घटकांवर आता अमेरिकेचा अप्रत्यक्ष प्रभाव वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील Loar Group ने फ्रान्समधील LMB Aerospace कंपनीचे अधिग्रहण केल्यानंतर, राफेलसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या उपकरणांच्या निर्यातीवर अमेरिकन नियंत्रण लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात राफेलच्या देखभाल आणि स्पेअर पार्ट्सच्या पुरवठ्यावर बाह्य हस्तक्षेप वाढू शकतो, असा त्यांचा इशारा असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत भारताला त्यांचा सोर्स कोड मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय वायुसेनेला स्वतःच्या गरजेनुसार थ्रेट लायब्ररी अपडेट करता येणार नाही. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून येणाऱ्या नव्या तांत्रिक आव्हानांचा सामना करताना ही मोठी अडचण ठरू शकते. यामुळे भारताच्या संरक्षण निर्णयांवरील स्वायत्तता मर्यादित होत असल्याचे स्पष्ट केले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्याचप्रमाणे, संयुक्त अरब अमिरातीने राफेलच्या पुढील विकासासाठी निधी देण्याचा निर्णय मागे घेतल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या बाबतीत तडजोड न करण्याची भूमिका UAE ने घेतली, मात्र भारताने ती घेतलेली दिसत नाही. फ्रान्ससोबत ११४ राफेल विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेला सुमारे ३.२५ लाख कोटी रुपयांचा करार हा देशाच्या दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे सांगितले.

या सर्व पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, भारताने राफेलऐवजी रशियाचे Sukhoi Su-57E लढाऊ विमान का निवडले नाही. त्यांच्या मते, परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्यामुळे भारताच्या लष्करी स्वायत्ततेवर गदा येत असून, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची भूमिका अधिक ठामपणे राबवण्याची गरज आहे.

शेवटी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, लढाऊ विमानांचे इंजिन, महत्त्वाचे तांत्रिक भाग आणि सॉफ्टवेअर नियंत्रण जर परदेशी शक्तींच्या हातात राहिले, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि सार्वभौमत्वावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या संरक्षण धोरणाचा पुनर्विचार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *