केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. २०१९ नंतर नोंदणीकृत सर्व नव्या वाहनांना निर्माता कंपन्यांकडूनच एचएसआरपी बसवून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य ॲड.अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या दरासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मंत्री सरनाईक यांनी उत्तर दिले.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत १६,५८,४९५ वाहनांनी एचएसआरपी साठी नोंदणी केली असून, त्यापैकी ३,७३,९९९ वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेत कार्यक्षमतेसाठी तीन विभाग तयार करण्यात आले असून, वेगवेगळ्या क्लस्टरच्या माध्यमातून कामाचे नियोजन आखण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, शासनाने विविध राज्यांतील एचएसआरपी लावण्याच्या दरांबाबतही स्पष्टता यावेळी दिली आहे. महाराष्ट्र राज्यामधील दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या दरांमध्ये विसंगती असल्याचे आरोप होत आहेत. तरी सर्व पुरावे तपासून घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. तथापि दरामध्ये बदल होणार नसल्याचेही परिवहन मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नंबर प्लेटबाबत विविध राज्यातील दरांची माहिती देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये दुचाकी वाहनासाठी एचएसआरपी बसविण्यासाठी रुपये ४५० हा दर निश्चित करण्यात आला असल्याचे सांगून एचएसआरपी संदर्भात अन्य राज्यातील दराची माहिती दिली. दुचाकी वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी आंध्र प्रदेश – रुपये ४५१, आसाम – रुपये ४३८, बिहार – रुपये ४५१, छत्तीसगड – रुपये ४१०, गोवा – रुपये ४६५, गुजरात – रुपये ४६८, हरियाना – रुपये ४६८, हिमाचल प्रदेश – रुपये ४५१, कर्नाटक – रुपये ४५१, मध्य प्रदेश रुपये ४६८, मेघालय – रुपये ४६५, दिल्ली – रुपये ४५१, ओडिशा – रुपये ५०६, सिक्कीम – रुपये ४६५, अंदमान निकोबार – रुपये ४६५, चंडीगड – रुपये ५०६, दिव आणि दमण – रुपये ४६५, उत्तर प्रदेश – रुपये ४५१, आणि पश्चिम बंगाल – रुपये ५०६ असा दर आकारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी वेगवेगळे दर असल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, एचएसआरपी लावण्याची मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना त्यांच्या वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार असल्याचेही सांगितले.
शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, सरकारच्या या योजनेंतर्गत २०१९ च्या पूर्वी नोंदणीकृत सुमारे १.७५ कोटी वाहनांना एचएसआरपी बसवली जाणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेस सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच सर्व वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, अशी खात्रीही यावेळी दिली.
Marathi e-Batmya