महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून कुस्ती रसिकांची मने जिंकली आहेत, असे गौरवोद्गार काढत या स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा थरार अनुभवायला मिळाला. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार खेळ करत मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. अंतिम सामन्यातील हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांची झुंज ही खऱ्या अर्थाने कुस्ती परंपरेची मान उंचावणारी ठरली. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, परंपरेचा ठेवा असलेला रांगडा क्रीडाप्रकार आहे, कुस्तीच्या माध्यमातूनच पै. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. ही परंपरा पुढे नेण्याचे काम आजचे तरुण पैलवान करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

वाघोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत अनेक रोमांचक आणि चुरशीचे सामने रंगले. भव्य आणि उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धेला विशेष उठाव प्राप्त झाला. या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *