राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काही काम नाही. अशा प्रकारचे कोण फोन टॅपिंग करत असेल असे अजिबात वाटत नाही. संजय राऊत फोन वरुन काही खळबळजनक बोलणार आहेत का? असा सवालही प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काही काम नाही. अशा प्रकारचे कोण फोन टॅपिंग करत असेल असे अजिबात वाटत नाही. संजय राऊत फोन वरुन काही खळबळजनक बोलणार आहेत का?त्याची त्यांना भीती वाटतेय. काही करत नाही तर घाबरण्याची काय गरज? संजय राऊत हे कांड करणारे नेते आहेत. निवडणुकीत काही भयानक करण्याचे त्यांच्या डोक्यात आहे का? त्या आधारे आपण फोनवरुन बोलू आणि पकडले जाऊ यासाठी अगोदरच थयथयाट केला की आपल्याला त्या गोष्टी सुरळीत करता येतात, असे राऊतांचे नियोजन असावे.
प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, विरोधकांच्या मनात निवडणुकीत काही विध्वन्सक करण्याचा डाव दिसतोय. त्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव आणून आपल्या गोष्टी निवडणुकीत सुरळीत करता येतील का? यासाठी हे आरोप सुरू आहेत. पोलीस पोलिसांचे काम करतील. परंतु आता आपण पराभूत होणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे चित्र उभे राहिलेय मग आता खोटेनाटे आरोप करणे, कुंभाड रचणे यातून अशा प्रकारचे आरोप होत आहेत.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर केलेल्या विधानावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, अरविंद सावंत पारखी आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर मी बोलू इच्छित नाही. महिलांचा अपमान करणारी वक्तव्य अरविंद सावंत यांच्याकडून येताहेत हे निषेधार्ह आहे. सावंत कधीच महिलांबाबतीत सहानुभूतीने बोलताना, महिलांचा आदर करताना दिसले नाहीत.
पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवकाश आहे. सदा सरवणकर तळागाळातील कार्यकर्ते, निष्ठावंत आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद, प्रेम आणि ताकद दिलीय. महायुती म्हणून एखादा निर्णय होत असतो तेव्हा त्या निर्णयाला साथ देण्याचे काम सदा सरवणकर देतील अशी अपेक्षा आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवेळी आमच्या महायुतीत नसतानाही देशहितासाठी, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी त्यांनी व्यापक भुमिका घेतली तेही लोकसभेला एकही जागा न लढवता. महाराष्ट्र ह सुसंस्कृत आहे. संपूर्ण देशात सुसंस्कृत राजकारण लोकशाहीची प्रगल्भता या राज्यात आहे. राज ठाकरेंनी केलेल्या मदतीची उतराई त्यांचे सुपुत्र निवडणूक लढवत असताना केली तर ते सुयोग्य ठरेल.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानावर प्रविण दरेकर म्हणाले की, नाथाभाऊंनी महाराष्ट्राचे सांगण्यापेक्षा, राज्याच्या राजकारणावर-महायुतीवर बोलण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळतेय ते पाहावे. जळगावच्या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यावेळी आपल्याला झालेल्या मतदानाचे नाथाभाऊंनी अवलोकन करावे. लोकसभेला जळगावात भाजपने प्रचंड यश मिळवले असेल तर उलटपक्षी विधानसभेला त्याहीपेक्षा चांगले यश मिळेल आणि नाथाभाऊंना त्यांचे डिपॉजिट टिकवण्यासाठी धडपड करावी लागेल.
जरांगे पूर्णपणे राजकीय झालेत
मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, मराठा समाजाच्या आंदोलनाचा आधार घेऊन मराठा समाजासमोर स्वप्न का उभी केली? आंदोलनातून या सरकारने अनेक गोष्टी दिल्या. त्या टिकविण्याची जबाबदारी घेतली. तुमच्या मनात मराठा समाजाच्या आक्रोशाचा फायदा घेऊन आपली लीडरशिप पुढे आणायची, लीडरशिप पुढे आल्यावर मराठा समाजाला बाजूला ढकलून द्यायचे. इम्तियाज जलीलला मिठी मारायची, औरंजेबाच्या समाधीवर जाऊन माथा टेकणाऱ्यांबरोबर गळाभेट करायची, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे बोलायचे आणि ओबीसीच्या हनुवटीला कुरवाळायचे. त्यामुळे जरांगे पूर्णपणे राजकीय झालेत. मराठा समाज त्यांच्यावर काडीचा विश्वास ठेवणार नाही. तुम्ही भुमिका स्पष्ट करा, असे आवाहनही केले.
Marathi e-Batmya