Breaking News

प्रविण दरेकर यांचा निर्धार, विरोधकांनी सेट केलेल्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश करणार जरांगे पाटील मुळ प्रश्नाला बगल दिली

खोटे नरेटिव्ह सेट करायचे, वर्तमान पत्रात, प्रसारमाध्यमांत बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे अशा प्रकारे दाखवायचे हा विरोधी पक्षाचा अलीकडच्या काळातील धंदा बनला आहे. ही लोकं कसे खोटे नरेटिव्ह सेट करतात याचा पर्दाफाश मी उद्या सोमवारपासून करतोय, असा इशारा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देत प्रविण दरेकर म्हणाले की, त्यांनी इतरांवर राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल द्यायला सुरुवात केलीय. या आंदोलनात कशा पद्धतीने फेक नरेटिव्ह सेट केले जातात, वक्तव्य केली जातात. या संदर्भातील पर्दाफाश मी उद्या करणारच आहे. महाराष्ट्रात सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सकारात्मक आहे. ओबीसीतूनच आरक्षण द्या असा आग्रह आहे, त्या आग्रहाशी राज्यातील एकही पक्ष सहमत नाही. जरांगे यांनी शरद पवारांनी ओबीसीतून आरक्षण द्यावे का? याबाबत भुमिका स्पष्ट करावी. काँग्रेस, उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीने ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात काय भुमिका आहे ते सांगावे, अशी मागणी केलीय. जरांगेंनी ज्या मागण्या केल्यात त्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी आपली भुमिका स्पष्ट करावी.

प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार बोलताहेत हाके, जरांगे यांना एकत्रित घेऊन बैठक घ्या. अशा प्रकारची बैठक करायला काहीच हरकत नाही. मुख्यमंत्री याची दखल घेऊन बैठक आयोजितही करतील. परंतु इकडे ढकलाढकलीचे कामं सुरू आहे. पवार इकडे बैठक घ्या बोलले, दुसरीकडे जरांगे बोलताहेत तिकडे जाऊन आम्ही काय करणार. दुसऱ्या बाजूला सरकारने भुमिका घ्यायचीय म्हणून शरद पवार बोलणार. सगळ्यांनी एका व्यासपीठावर येण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या मनात काय दडलेय, भुमिका काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल. मुख्यमंत्री ज्यावेळी पुढाकार घेतील त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित यावे, शरद पवारांनी आवर्जून उपस्थित राहून आपली भुमिका मांडावी, असे आवाहनही केले.

थोरवे-तटकरे यांच्यातील शाब्दिक वादावार बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, आमदारासारख्या महत्वाच्या लोकप्रतिनिधी, नेत्यानेही आपण महायुती म्हणून सामोरे जाणार असू तर महायुतीत वितुष्ट येईल अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत. खो-खो सारखा खेळ खेळू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मेळाव्यात सांगितले होते की कुणाला खुमखूमी आली तर पक्ष प्रमुखांशी बोला. कुणीही अशा प्रकारे महायुतीत वाद होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर, निवडणुकीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नये, असे खडेबोलही दरेकरांनी सुनावले.

उरण हत्याकांडावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, ही अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक घटना आहे.लव्ह जिहाद संदर्भात महाराष्ट्रात ज्या-ज्या भागात घटना झाल्या त्याची कार्यपद्धती पाहिली तर विदारक आहे. या भगिनीला ज्या प्रकारे मारले गेले, चेहरा विद्रुप केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात व्हायला लागल्यात. हे नराधम विशिष्ट प्रवृत्तीचे आहेत. ज्यावेळी आम्ही लव्ह जिहादसारखे मोर्चे काढतो त्यावेळी आम्हाला विशिष्ट अशा चौकटीत उभे केले जाते. या घटनेतून अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रवृत्तीना ठेचून काढण्याची गरज आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर प्रविण दरेकर म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जण आपले राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न करताहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे सर्व समाज घटकांनी शांततेत राहिले पाहिजे. जातीजातीत भिंती उभ्या करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला खतपाणी घालणारी वक्तव्य कुणी करू नये. जरांगे रोज देवेंद्र फडणवीस यांना आई-बहिणीवरून बोलत, शिव्या देत असतील, शिव्या दिल्यावरही एक आहे असे जर बोलत असू तर एवढा निर्लज्ज महाराष्ट्रातील संस्कार झालेला नाही.

अनिल देशमुखांच्या विधानावर प्रविण दरेकर म्हणाले की, गांधीजींचा सत्य हा मंत्र हा पुन्हा एकदा अंमलात आणण्याची गरज आहे. खोटे बोलायला आता काही लागत नाही. प्रसारमाध्यमासमोर येऊन कुठलाही पुरावा नसताना बोलायला काही लागत नाही. पुरावे असतील तर त्यांनी समोर आणावे. नरेटिव्ह सेट करायचे, वर्तमान पत्रात, प्रसार माध्यमांत बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे अशा प्रकारे दाखवायचे हा विरोधी पक्षाचा अलीकडच्या काळातील धंदा असल्याचा आरोपही दरेकरांनी केला. तसेच हे लोकं कसे नरेटिव्ह सेट करतात याचा पर्दाफाश उद्यापासून मी करतोय आणि याबाबत उद्या मी पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.

तिन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढणार

प्रविण दरेकर म्हणाले की, आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत त्यात दुमत असायचे कारण नाही. दोन्ही दादांनी केलेली वक्तव्ये ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात २८८ जागा लढण्याची क्षमता आणि त्या ताकदीचे उमेदवार भाजपाकडे आहेत. परंतु याचा अर्थ २८८ ठिकाणी भाजपा उमेदवार उभे करणार, महायुतीचे काय होणार असा तर्क काढण्याची गरज नाही. आम्ही महायुती समन्वयाने, सुसंवादातून-एकोप्याने महायुती म्हणून सामोरे जाऊ आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवू.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *