Breaking News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील 'उत्कृष्ट संसदपटू' आणि 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारांचे वितरण

महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचं देशात पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.

‘महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवा’ निमित्त विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘ वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व ‘ या ग्रंथाचे प्रकाशन तसेच ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहीलेल्या महाराष्ट्रांने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. वीरमाता जिजाऊ यांची धरती असलेल्या आणि स्त्री शिक्षणाची सुरवात करणारे महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, संसदीय लोकशाहीवर मार्गक्रमण करत असेलल्या भारताला घटना देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यासारख्या महान विभूतींचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकमहोत्सव साजरा होत असल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील जनतेचे, लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुढे म्हणाल्या की, विधान परिषद सभागृहाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक दिशादर्शक नियम, कायदे यांची निर्मिती केली आहे. जे पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वि.स.पागे यांनी दिलेला रोजगार हमी योजनेसारखा लोकोपयुक्त कायदा ही याच विधीमंडळाची देण आहे. देशाच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग.वा.मावळणकर हे याच विधान परिषदेचे सदस्य होते तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही याच विधीमंडळाच्या सदस्य राहिलेल्या आहेत. विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्यासोबतच लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विधीमंडळ काम करत आहे. या माध्यमातून जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे सांगून विधान परिषदेच्या शतकपूर्तीच्या वाटचालीचा आढावा घेणारा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केल्याबदद्ल तसेच या ग्रंथात तत्कालीन बॉम्बे विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती जेठी सिपाहीमलानी यांच्यावर सविस्तर माहिती देणारे प्रकरण ठेवल्या बद्दल अभिनंदन केले.

महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्य पदावर महिला अधिकारी तर पोलिस प्रशासनाच्याही प्रमुख पदावर महिला अधिकारी सक्षमपणे कार्यरत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून महाराष्ट्राच्या लेकी निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

महाराष्ट्र भक्ती, शक्ती आणि प्रगतीची भूमी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यासारख्या महान संताची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या पावन भूमीत हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. त्यांच्या कार्यामुळे देशाची जगात ओळख आहे. छत्रपतींच्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान असून प्रत्येकाच्या मनात त्यांची अमीट छाप आहे. महाराष्ट्र भक्ती, शक्ती आणि प्रगतीची भूमी आहे. असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्याच्या विकास कार्यात मोठे योगदान आहे. महाराष्ट्र विधिमंडळात मांडलेली रोजगार हमी योजनेची संकल्पना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारली गेली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असलेल्या लाखो गरजूंना सहायक ठरणारा हा क्रांतिकारी निर्णय लोकशाही इतिहासातील एक अद्वितीय उदाहरण आहे. सामाजिक आणि राजकीय सौहार्दासाठी महाराष्ट्र ओळखला जातो. या शतक महोत्सवानिमित्त उत्कृष्ट संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन केल्याबद्दल अभिनंदन करुन राज्यपालांनी यांनी पुरस्कार विजेत्या सदस्यांचे अभिनंदन केले.

महिला सक्षमीकरणासाठी शासन कृतीशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतिशय संघर्षमय वाटचाल करत आज देशाच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांची वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन उपयुक्त निर्णय, महत्वाच्या योजना राबवत असून मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. महिलांना आर्थिक सहाय्य करणारी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरु झाली असून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळाला आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारी लखपती दिदी योजना, शासकीय कागदपत्रांवर आपल्या नावाच्या पुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय तसेच लेक लाडकी योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोफत शिक्षणाची संधी, यासोबतच महिलांसाठीच्या अनेक उपयुक्त योजना राज्य शासन राबवत आहे. एका बाजूला विकास साधताना दुस-या बाजूला कल्याणकारी योजनांची जोड देत महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सक्षम लोकशाहीसाठी महाराष्ट्र विधीमंडळाचे योगदान उल्लेखनीय-विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर

महाराष्ट्र विधीमंडळाला गौरवशाली पंरपरा असून येथील अनेक सदस्यांनी विधीमंडळ कामकाजात भरीव योगदान दिले आहे. आज राष्ट्पतींच्या उपस्थितीत होत असेलला विधानपरिषद शतकमहोत्सवी सोहळा या परंपरेच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे सांगून विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणाले की, विधीमंडळाच्या कार्यपद्धतीत कालानुरुप अनेक बदल करण्यात येत असून कृत्रिम बुद्धिमता तसेच माहिती तंत्रज्ञान कार्यप्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. देशाच्या संसदीय कार्यपद्धतीत महाराष्ट्राच्या विधीमंडळाची ठळक ओळख असून या सर्वांचा आढावा घेणारा हा संदर्भ ग्रंथ सर्व संबंधितांना मार्गदर्शक ठरणारा आहे,असे सांगितले.

सदस्य, अभ्यासक, संशोधकांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथाची निर्मिती-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपतींची उपस्थिती ही या सभागृहाच्या वारश्याला अधिक संपन्न करणारी ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विधान परिषदेने वरिष्ठ सभागृह म्हणून या शंभर वर्षांत राज्याच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. या सर्वांचा परामर्श घेणारा सर्वंकष संदर्भ ग्रंथ प्रकाशित होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यामध्ये सहकार्य केलेल्या संपादकीय मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले. वरिष्ठ सभागृह म्हणून राज्याच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडत असतानाच आवश्यक विषयांवर चर्चा, कायदे निर्मीतीचे महत्वाचे कार्य या सभागृहाने गेल्या शतकापासून केलेले आहे.

यामध्ये प्रामुख्याने रोजगार हमी योजना, एकाधिकार कापूस खरेदी योजना, महिला आयोग, देवदासी संरक्षण कायदा, पंचायत राज, रॅंगिग विरोधी कायदा, अल्पसंख्याक आयोग, डान्सबार बंदी विधेयक, ,शालेय शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय, यासारखे देशपातळीवर उल्लेखनीय ठरलेले निर्णय घेतले असून या सर्वांचा परामर्श या संदर्भ ग्रंथात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्रीमंडळातील सदस्य, तसेच माजी आजी सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. वर्षनिहाय पुरस्कार विजेत्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे –
सन २०१८-१९ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, डॉ. संजय कुटे उत्कृष्ट भाषण पुरस्कार – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा सदस्य पराग अळवणी.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य निरंजन डावखरे. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – हुस्नबानू खलिफे, सुजितसिंह ठाकूर.
सन २०१९-२० विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रकाश आबिटकर, आशिष शेलार.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सुनील प्रभू, दिलीप मोहिते-पाटील.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सतीश चव्हाण, अनंत गाडगीळ.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – रामहरी रूपनवार, श्रीकांत देशपांडे.
सन २०२०-२१ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – अमित साटम, आशिष जयस्वाल.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – प्रताप सरनाईक, प्रकाश सोळंके.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रवीण दरेकर, दिवंगत सदस्य विनायक मेटे.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य – मनीषा कायंदे, बाळाराम पाटील.
२०२१-२२ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य संजय शिरसाट, प्रशांत बंब.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सरोज अहिरे, सिद्धार्थ शिरोळे.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत,
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – गोपीकिशन बाजोरिया, विक्रम काळे
सन २०२२-२३ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य भरत गोगावले, चेतन तुपे, समीर कुणावार. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य यामिनी जाधव, अभिमन्यू पवार.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार -सदस्य बाबाजानी दुर्राणी, प्रज्ञा सातव.
सन २०२३-२४ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य रमेश बोरनारे, अमिन पटेल, राम सातपुते.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य कुणाल पाटील, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रमेश पाटील.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, सुनील शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *