Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला ओडिशातील रत्नभांडारचा मुद्दा

लोकसभा निवडणुकीत एनडीए ४०० जागांचा टप्पा पार करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. ५० जागाही मिळवू न शकणारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी बाकावर देखील बसू शकणार नाही अशी खिल्लीही पंतप्रधान मोदी यांनी उडवली.

ओडिशातील कंधमाल, बोलंगीर आणि बरगढ येथे आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी काँग्रेसबरोबर बिजू जनता दलालाही आपल्या टीकेचे लक्ष्य केले.

आदिवासींच्या जमीनी हडपणाऱ्या आणि सामान्य माणसाला केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवणा-या नवीन पटनायक सरकारला त्यांची जागा दाखवा, त्यासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले. विकसित ओडिशा, विकसित भारतासाठी एक-एक मत महत्वाचे आहे असे सांगत सर्वच्या सर्व २१ खासदार ओडिशातून दिल्लीत पाठवा आणि ओडिशा विधानसभेतही भाजपाला बहुमत द्या, अशी सादही घातली. केंद्रीय मंत्री आणि संबलपूरचे उमेदवार धर्मेंद्र प्रधान, कंधमालचे उमेदवार सुकांत कुमार पाणिग्रही, बोलंगीरच्या उमेदवार संगीता कुमारी देव आदी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगत आणि विकासाची दृष्टी ठेवत भाजपा सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी अहोरात्र कार्य करीत आहे, असे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील मातीशी नाते असणारा, संस्कृतीचा अभिमान असणाराच ओडिशाचा मुख्यमंत्री बनेल असा विश्वास व्यक्त केला.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, २६ वर्षांपूर्वी अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आजच्याच दिवशी पोखरण अणू चाचणी करून बलशाली देशाचे चित्र जगासमोर ठेवले होते. देशभक्तीने प्रेरित होऊन सरकार देशहितासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी आणि भारतीयांच्या आशा आकांक्षांसाठी कसे काम करते हे अटलजींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने आणि गेली १० वर्ष मोदी सरकारने दाखवून दिले आहे. एकीकडे अणुचाचणी करणारे भाजपा सरकार तर दुसरीकडे पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती घालणारे काँग्रेस नेते, यातला फरक मतदारांनी ओळखावा, असे आवाहनही यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मोदीची हमी म्हणजे हमी पूर्ण होण्याची हमी आहे हे लोकांना आता ठाऊक आहे. युवकांना स्वत:चा व्यवसाय़ सुरु करण्यासाठी मुद्रा योजने अंतर्गत विना तारण १० लाखांऐवजी २० लाखांचे कर्ज देण्याची हमी मोदींनी दिली आहे. ओडिशा भाजपा ने ३१०० रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदीची आणि ४८ तासांत पैसे खात्यात जमा करण्याची हमी दिली आहे. मसाला पार्क स्थापन करण्याची हमी दिली आहे. तेव्हा या मोदीवर भरोसा ठेवत आम्हाला एक संधी द्या आम्ही राज्याला अव्वल बनवू, असा शब्दही यावेळी दिला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, श्री जगन्नाथ मंदिरातील सोने चांदी, आभूषणे,रत्ने ,सर्व संपत्तीचे मूल्यांकन करण्याचा नियम ७ दशकांपूर्वीच बनला होता. बिजू जनता दल सरकारच्या काळात या भांडाराच्या चाव्याच गहाळ झाल्या. जे सरकार श्री जगन्नाथाच्या रत्न भांडाराचे रक्षण करू शकत नाही ते तुमचे रक्षण काय करणार असा सवाल करत बिजू जनता दल सरकारवर प्रहार केला. चाव्या नेमक्या कुठे गेल्या?, देवस्थान भांडारातील किमती सामानाची चोरी झाली का? असे प्रश्न विचारत पंतप्रधान मोदी यांनी बिजू जनता दल सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा हा मुद्दा उपस्थित करत असताना बिजू जनता दलाचे सरकार मात्र याबाबत मौन बाळगून आहे. हे सरकार कोणाच्या पापावर पांघरूण घालत आहे याबाबत जनतेने विचार करावा असे नमूद करत ओडिशामध्ये आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराच्या कारभारात पारदर्शकता आणू अशी हमीही दिली. भाजपाचे लक्ष्य गरीब कल्याण आणि विकास आहे. एक जरी गरीब देशात असला तरी मला चैन पडणार नाही. आत्तापर्यंत २५ कोटी जनतेला आमच्या सरकारने गरीबीतून बाहेर काढले आहे. गरीबांना मोफत धान्य आणि पक्क्या घराची हमी भाजपाने दिली आहे. या योजनांचा ओडीशातील आदिवासी समाजाला मोठा लाभ झाला आहे. अनेक कल्याणकारी योजनांमध्ये ओडीशातील बिजू जनता दल सरकार खोडा घालते. त्यामुळे या लाभांपासून येथील जनता वंचित राहत आहे. ओडिशा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे, पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. मात्र बिजू जनता दल सरकारच्या उदासिनतेमुळे विकास ठप्प आहे. अशा असंवेदनशील, निष्क्रीय आणि तुम्हाला केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवणा-या सरकारला धडा शिकवा असे आवाहनही यावेळी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकसित ओडिशा आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत प्रथमच ओडिशाने डबल इंजिन सरकार बनवण्याचा आणि भाजपाला लोकसभेच्या सर्व २१ जागांवर विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे. असेही सांगितले.

आदिवासी कन्या आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी रामललाचे दर्शन घेऊन आल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने घोषणा केली की आता आम्ही राम मंदिर गंगाजलाने धुवून शुद्ध करू. हा देशाचा, आदिवासी समाजाचा आणि माता भगिनींचा अपमान आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या सर्व जागांची अनामत रक्कम जप्त करावी, अशी मागणीही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *