मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन सन्मानजनक जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीत रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत राहणार असून सदरच्या राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे महत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणतात. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला निश्चित समाधानकारक जागा महानगरपालिका निवडणुकीत मिळतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. आज बांद्रा येथील रिपाइंच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.
रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने २६ वॉर्ड निवडले होते. चर्चेसाठी महायुतीकडे २६ वार्डांची यादी देण्यात आलेली आहे. त्या २६ वॉर्डापैकी किमान १६ जागा महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात अशी आग्रही मागणीही यावेळी केली.
तसेच रामदास आठवले म्हणाले की, मागील काही दिवस जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला चर्चेमध्ये सहभागी करुन घेतले नाही. भाजपा शिवसेनेकडुन रिपब्लिकन पक्षाला चर्चेचे बोलावणे सुध्दा आलेले नाही. याबद्दल रिपब्लिकन पक्षात नाराजी आहे. ही नाराजी आपण उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार आहोत असेही यावेळी सांगितले.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट असले तरी रिपब्लिकन पक्षाचा माझा गट सर्वात मोठा गट आहे. आमचा रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांचा विजय होतो. आम्ही ज्यांना साथ देतो त्यांनाच सत्ता मिळते हा इतिहास आहे. त्यामुळे याही वेळेस रिपब्लिकन पक्ष हा महायुती सोबत राहणार असून महायुतीचाच विजय होणार आहे. महायुती आम्हाला सन्मानजनक जागा देतील असा विश्वास असल्याचे व्यक्त केला.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, २०१२ च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचे मोठे आव्हान असताना रिपब्लिकन पक्षाने शिवशक्ती – भिमशक्तीचा प्रयोग केल्यामुळे शिवसेना-भाजपची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आली होती. १९९२ मध्ये काँग्रेस सोबत असतांना रिपब्लिकन पक्षाचे मुंबईत १२ नगरसेवक होते. तसेच तेंव्हा मुंबईचा महापौर सुध्दा रिपब्लिकन पक्षाचा झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीचा अंदाज आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला महायुतीत निश्चितच समाधानकारक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीतुन भाजपचे रिपब्लिकन पक्षाला ज्या जागा सोडतील त्या जागा कमळ चिन्हावर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन लढण्यास रिपब्लिकन पक्ष तयार आहे. सन १९९२ मध्ये कॉग्रेसच्या पंजा चिन्हावर रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक निवडुन आले होते. त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे महापौर झाल्या होता. मागील २०१७ च्या निवडणुकीत पुणे शहरात रिपब्लिकन पक्षाने भाजपाच्या कमळ चिन्हांवर १३ जागा लढुन त्यापैकी ५ जागा निवडुन आल्या होत्या. ५ वर्ष पुण्याचा उपमहापौर हा रिपब्लिकन पक्षाचा होता. जरी कमळ चिन्हावर निवडणुक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी लढली, तरी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक म्हणून त्यांना वेगळा गट म्हणून मनपात मान्यता देण्यात येते. मुंबईत सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कमळ चिन्हावर महानगरपालिकेची निवडणुक लढण्यास तयार आहेत . रिपब्लिकन पक्षाला महायुतीतुन समाधानकारक जागा भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सोडाव्यात. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपा या दोन्ही पक्षाला रिपब्लिकन पक्षाचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपआपल्या कोटयातल्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात आणि मुंबईत चर्चेसाठी दिलेल्या २६ जागांपैकी किमान १६ जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली.
यावेळी पत्रकार परिषदेत भाजपाचे विशेष दुत प्रविण दरेकर ते तातडीने रामदास आठवले यांची भेट घेण्यास आले. आणि त्यांनी या रिपब्लिकन पक्षाचा निश्चित सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आंबेडकरी चळवळीचा चेहरा आणि नेतृत्व फक्त रामदास आठवले यांचे आहेत. ते महायुतीचे नाही तर संपूर्ण देशाचे नेते आहेत .त्यांचा योग्य सन्मान होईल. सन्मानजनक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येतील असे आश्वासन भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई सरचिटणीस विवेक पवार; ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर; युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे;एम एस नंदा; सचिनभाई मोहिते; रमेश गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Marathi e-Batmya