रामदास आठवले यांची मागणी, अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करा बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करा

बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी आमंत्रित केले असून, मी बारामतीला जाणार आहे. काँग्रेस पक्षाने अजित पवार यांचे योगदान लक्षात घेऊन ही जागा बिनविरोध निवडून द्यावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बारामतीमध्ये उमेदवार देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. अजित पवार हे राज्यातील एक मोठे नेते होते. त्यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले असल्याचेही यावेळी सांगितले.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मला मिळालेल्या खासदार पदाचा उपयोग देशभरात पक्ष वाढवण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्यासाठी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मला पाठबळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे अनागोंदी सरकार असून, यंदाच्या निवडणुकीत भाजपा सत्तेत येईल, तेथे मी प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहे. आसाममध्ये चार ठिकाणी, तर तामिळनाडूमध्ये ४० उमेदवारांना आमच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. तामिळनाडूमध्ये यंदा एनडीए सत्तेत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पक्ष मान्यता टिकवून ठेवण्यासाठी विविध राज्यांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहोत. पाँडिचेरीमध्ये आम्ही भाजपाला साथ दिली आहे, तर केरळमध्ये एक जागा लढवत असल्याचे सांगितले.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, ओबीसींना देखील राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे. महिलांसाठी लोकसभेत २७३ जागा वाढवण्यासाठी लवकरच संसदेत विशेष विधेयक येणार आहे, ज्यामुळे महिलांना राजकारणात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळेल, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

शेवटी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषदवरील आमदारकी आणि दोन महामंडळाची पदे देण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाला लवकरच हा वाटा मिळावा, अशी आमची मागणी आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपाने रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद दिले आहे. त्यांच्यावर अन्याय होत नाही, पण त्यांना आवश्यक बैठकांना बोलावले गेले पाहिजे. दोन पक्षांमध्ये गैरसमज होऊ नयेत यासाठी चर्चा करून कोणताही वाद राहू नये, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *