बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच आणि याप्रकरणी राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असताना राज्य सरकारकडून राजकीय तडजोड करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा सर्वच क्षेत्रात आहे. त्याच या हत्या प्रकरणातील तपासाची माहिती पोलिसांकडून देशमुख कुटुंबियांना देण्यात येत नसल्याच्या मागणीवरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थांकडून पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
त्यातच आज पोलिसांकडून एका बाजूला तपासाची माहिती देण्यात येत नाही आणि दुसऱ्याबाजूला धनंजय देशमुख यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर स्वतच स्वतःचा जीव देतो असे सांगत धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थानी मोबाईल टॉवर चढून जीव देण्याचा इशारा दिला होता. मात्र मोबाईल टॉवरला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने अखेर धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर टिका करत या संपूर्ण तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं असा खोचक सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.
शेवटी रोहित पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या असा इशाराही यावेळी दिला.
मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 13, 2025
Marathi e-Batmya