खुषखबर : शाळा सुरु होणार, वाचा मुख्यमंत्री काय म्हणाले योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळी नंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही  त्यांनी यावेळी केले आहे.

शिक्षकांची तपासणी करणार : प्रा. वर्षा गायकवाड

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. २३ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल.

एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठिण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरू करतांना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या; तसेच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.

शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव कृष्णा यांनी सांगितले.

About Editor

Check Also

रमेश चेन्नीथला यांचा इशारा, शेतकरी, बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते निर्धाराने लढले

काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *