Breaking News

शंभुराज देसाई यांचा आरोप, शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक अनुपस्थितीत

मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. या बैठकीला अनुपस्थित राहून विरोधी पक्षांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा, सामाजिक तेढ निर्माण करण्याला अधिक खतपाणी घालायचे असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केला. सरकारला असहकार्य करण्याची आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. मराठा ओबीसीच्या आरक्षणाचा वाद चिघळत ठेवून महाराष्ट्रातील शांतता भंग करायची असल्याचा आरोप राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांवर केला.

पुढे बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकारने मराठा समजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे १० टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. मात्र मराठवाड्यातल्या काही नेत्यांनी ओबीसी आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी लावून धरल्याने राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रश्नी दोन्ही समाजात सौहार्दाचे वातावरण कायम राहावे ही सरकारची भूमिका आहे. मात्र या भूमिकेला तडा देण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी केल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला.

शंभुराज देसाई पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी दांडी मारली. यामागे त्यांचा उद्देश काय आहे, असा परखड सवालही केला.

पुढे बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीचे महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेत्यांना लेखी निमंत्रण देण्यात आले होते. त्याचबरोबर संबधित विभागाकडून या नेत्यांना फोनद्वारे बैठकीची माहिती देण्यात आली होती. ज्यांना मुंबईत येणे शक्य नाही, अशांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली. मात्र संध्याकाळी सहा वाजता विरोधकांनी निरोप दिला की बैठकीला येणार नाही. यावरुन विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसून आली, अशी टीकाही यावेळी केली.

शेवटी शंभुराज देसाई म्हणाले की, निवडणुकीपूर्वी विरोधकांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर विनाकारण राजकारण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते. सर्वपक्षीय बैठकीला पाठ फिरवणे आणि नंतर सरकारवरच टीका करणे हा विरोधकांचा डाव आहे, असा आरोप केला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *