राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेती पिकांच्या नुकसानीचा मुद्दा आणि शेतकरी आत्महत्ये प्रश्नावरून राज्य सरकारचे लक्ष्य वेधले. तसेच या प्रश्नावरून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवरही शरद पवार यांनी टीका केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांत दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. नाशिक येथे आयोजित एका आक्रोश मोर्चात बोलताना, संकटातून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असल्याची टीकाही केली.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ, पीकविमा, हमीभाव, खतांच्या वाढलेल्या किमती, रोगांचा प्रादुर्भाव, रानटी जनावरांचा हैदोस अशा विविधं प्रश्नांवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी नाशिकमध्ये आयोजित 'शेतकरी आक्रोश मोर्चा'त सहभागी झालो व उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं.… pic.twitter.com/bwhHFClVhl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 15, 2025
‘सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय’ – शरद पवार
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, बीडसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी अस्वस्थ आहे. कधी दुष्काळ, तर यंदा अतिवृष्टी, संकटे येतात, पण त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची असते. मात्र, सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या या आक्रोशाकडे दुर्लक्ष करत आहेत असेही सांगितले.
कर्जमाफी आणि आत्महत्येचा मुद्दा
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यांत दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची गंभीर आकडेवारी सांगत यामागे सरकारच्या अपयश असल्याचे म्हटले. शेतकरी जीव देतो, कारण संकटाच्या काळात सरकार त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याची टीकाही यावेळी केली.
यावेळी शरद पवार यांनी आपल्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळातील एका आठवणीला उजाळा दिला. यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सोबत घेऊन त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती, असेही सांगितले.
देवाभाऊ अभियानावर टीका :
शेवटी बोलताना शरद पवार यांनी यांनी भाजपाच्या ‘देवाभाऊ’ अभियानावरही टीका केली. शिवाजी महाराजांचे नाव घेणारे सरकार बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही, सरकारने तात्काळ मदत न केल्यास नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप धारण करेल, असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya