नवी दिल्लीः प्रतिनिधी
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी महायुतीला आवश्यक असलेले संख्याबळ मिळूनही त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून भाजपाविरोधात कडक भूमिका घेतली जात आहे. परंतु राज्यातील राजकिय परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि आम्ही पुन्हा एकदा भेटणार असून त्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. पवारांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी मदती करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावेळी पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार उपस्थित होते.
विधानसभेच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुचविले होते. त्यानुसार त्यांना माहिती देण्यासाठी आलो. यावेळी काँग्रेस नेते ए.के.अॅटनी हेही उपस्थित राहील्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या राजकिय परिस्थितीबाबत चांगल्यापैकी चर्चा झाली असून सध्या आम्ही थांबा आणि पहा असे करत आहोत. आणखी एक दोन दिवस राज्यातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पुन्हा आम्ही सोनिया गांधी यांची भेट घेवून चर्चा करणार असून त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून असे सरकार स्थापन करणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आलेला नसताना पाठिंबा कसा देणार असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे संजय राऊत हे माझे राज्यसभेतील मित्र असल्याने ते सतत भेटत असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तविण्यात येत असल्याबाबत विचारले असता राष्ट्रपतींनी भाजपा नेत्यांना अॅथोराईज केले असेल अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान सकाळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. राज्यातील राजकिय परिस्थितीतून तोडगा काढण्याच्यादृष्टीने गडकरी यांच्यासोबत फडणवीस यांनी अर्धातास चर्चा केली. त्यामुळे भाजपामधून फडणवीस यांना फारशी मदत करण्यासाठी कोणी इच्छुक नसल्याचे वातावरण निर्माण होत आहे.
Marathi e-Batmya