Breaking News

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, ज्यांनी जनतेचा घात केला त्यांना धडा शिकवायचा भाजपाचे माजी आ सुधाकर भालेराव यांचा शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत मुंबईत आज पक्षप्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्याना सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूयात. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या २२५ जागा निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे, असच सगळ्यांना वाटत आहे. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे. एक उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला. लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांच स्वागत करतो असे सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले की, राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी विरोधी गटाचे फक्त ६ लोक निवडून आले होते. लोकांनी मोदीचे सरकार पाहिले आणि हे बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी ३१ जणांना निवडून दिलं आहे. या ३१ पैकी राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ जागा निवडून आल्या आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या २८८ पैकी २२५ जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

गद्दारी नामशेष करण्याची जबाबदारी तुमची – जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले की, लातूरमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठा कार्यक्रम होणार आहे उदगीर आणि अहमदपूर मध्ये, देवळाली मतदार संघ येथील सुद्धा नाशिकचे काही लोक आले आहेत. अजित पवार यांच्या सोबत गेलेले काही कार्यकर्ते आज परत येत आहेत नाशिक येथील देवळाली मतदारसंघ काहीही झाले तर जिंकायचा आहे. ही तुतारी आम्ही सुधाकर भालेराव आम्ही तुमच्या हातात देत आहोत. लातूर जिल्ह्यात मदत होईल पण राज्यात सुद्धा मातंग समाज सोबत आला पाहिजे. सुधाकर भालेराव यांच्यावर आमचे बऱ्याच दिवसापासून लक्ष होते, त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल होती. पण, विचारांचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो, मातंग समाजाचे देखील नेतृत्व त्यांनी केलंय. ते १० वर्ष विधिमंडळात देखील ते होते. तसेच, महाराष्ट्रातून संघटन देखील त्यांनी निर्माण केलं आहे. पवार साहेबांनी २०१९ सालीच सामाजिक न्याय खातं मागितलं होतं. मागे राहिलेल्या घटकांसाठी विशेष प्रयत्न आपण करूयात. विकासासाठी आपण काय करतोय? अल्पसंख्याक देखील आपण मागून घेतलं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्यांच्यावर देखील गोष्टी अवलंबून असतात असे सांगायलाही यावेळी विसरले नाही.

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील रिपब्लिकन गट संलग्नित आहे, भारदार आणि जोरदार वक्ता आम्हाला आज मिळतोय. तुम्ही जिथून येता तिकडे आमचे अधिक लक्ष आहे. मराठी माणसाला सर्व सहन होतं. मात्र, फसवलेलं सहन होत नाही. मराठी माणसांना सुर्याची पिसाळसारखी लोकं आवडत नाहीत, गद्दारांना योग्य प्रायश्चित देण्याचे काम कराल. आपण नवीन आलोय असं त्यांना वाटू देऊ नका, लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात वेळ द्यावा. त्याप्रमाणे मी पवार साहेबांना विनंती करेल, योग्य वेळ द्यावा. विनायकराव पाटील यांच्या मतदारसंघात इथं देखील जायचं आहे. लक्ष्मण मंडाले आणि अशोक पारडे यांचा देवळाली मतदारसंघातून पक्षप्रवेश देण्यासाठी कार्यकर्त्यांना आणलेलं आहे. इतर पक्षातून आणि आपल्याबरोबरचा गट गेलेला त्यातूनही काही लोकं येत आहेत. त्या सर्वांचेच मी स्वागत करतो, प्रचार करायला वेळ मिळाला नाही. आता, तुतारीचा प्रभाव इतका वाढला की तुतारी वाद्याला देखील लोकांपर्यंत पोहोचवले आहे. १० मतदारसंघापैकी ९ ठिकाणी जनतेनं पवार साहेबांना उचलून धरलं. एका नेत्याच्या मागे लोकांचं हे मोठं प्रेम आहे, असेही यावेळी सांगितले.

MBBS आता महागाई, बेरोजगरी, भ्राष्टाचारी सरकार – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी परिवारात आपलं स्वागत आहे, आपण लहानपणापासून एक संघटनेत काम करत आलोय. अनेक आव्हाने समोर आलीत आणि त्यात आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांचे मी स्वागत करते. लातूरशी आमचे रुणानुबंध आहेत, लातूर भूकंपाची अनेकदा चर्चा होते, महत्त्वाचा जिल्हा आहे, राज्याचे मुख्यमंत्री देखील लातूरचे राहिले आहेत. विलासराव देशमुखजी यांची आठवण येतेच येते, त्यांनी आघाडी धर्म चांगल्या पद्धतीने पाळला. महाविकास आघाडीचा चांगला परफॉर्मन्स राहिला असल्याचेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एमबीबीएस म्हणतो महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार. क्राइम वाढतोय, हिट ॲंड रन वाढतोय. महाराष्ट्राचे झालंय काय? देश आपल्याकडून शिकायचा इकडून तिकडून हे कॉपी करत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमानी माणसांचं आहे. मराठी माणूस स्वाभिमानी आहे, त्यांनी भ्रष्टाचाराला नाकारलं आहे. ३० आले म्हणून हवेत नाही जायचं, दीड लाखांच्या लीडनं आलोय, त्यामुळे आणखी मेहनत करावी लागेल. पक्ष, चिन्ह गेले तरीही जिंकलो. तुतारी, पिपाणीचं अजूनही सुरुच आहे. कोर्टाच्या पायऱ्या चढतोय, कुठलीही पायरी चढू पण लढू. तुम्ही सांभाळा, आम्ही देखील सांभाळतो, असे आवाहनही यावेळी केले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *