Breaking News

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अखेर आशिष शेलार यांची सरकारच्यावतीने माफी सर्वचस्थरातून टीकेचा भडीमार सुरु झाल्यानंतर अखेर माफीनामा

मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाचे औचित्य साधत करण्यात आले. त्यास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही तोच पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झो़ड उठली. विरोधकांबरोबरच अनेक शिवप्रेमी आणि विविधस्तरांतूनही टीकेची झोड उठली. त्यामुळे अखेर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सरकारच्यावतीने माफी मागितली.

सिंधूदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारला तसेच देशातील पहिल्या नौदलाची स्थापनाही केली. त्यामुळे भारतीय नौदलाच्या इतिहासात शिवाजी महाराज यांना मानाचे स्थान आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नौदलाच्या झेंड्यावर शिवछत्रपतीनीं तयार केलेले नाविक दलाचे चिन्हाला स्थान दिले. त्यानंतर सिंधूदुर्ग किल्ल्याच्या जवळ शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारत त्याचे अनावरणही केले.. या पुतळ्यास आठ महिने होत नाहीत तोच हा पुतळा कोसळला.

यावरून विरोधकांकडून समुद्राच्या कडेला असलेल्या ठिकाणी पुतळा उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत पुतळा उभारताना तेथील वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याचा परिणाम पुतळ्यावर काय होईल याचा विचार केला नसल्याचा आरोप केला. तसेच हा पुतळा उभारताना दर्जा न राखता निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे या पुतळा उभारणीतही सरकारने पैसा खाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडीत महाविकास आघाडीतील विविध पक्षांकडून आंदोलन स्थळी आणि राज्याच्या इतर जिल्ह्यातही आंदोलनास सुरुवात झाली.

या पुतळ्याच्या टीकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पुतळा नौदलाने उभारल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांसह सर्वच स्तरातून टीका तशीच सुरु राहिली.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून होणारे संभाव्य राजकारण भाजपासह शिवसेना, आणि अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादीला परवडणारे नाही. त्यामुळे अखेर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्यावतीने पुतळा कोसळण्याप्रकरणी विरोधकांची आणि जनतेची माफी मागितली आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनी सरकारच्यावतीने माफी मागितली असली तरी ते प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी नसल्याने त्यांच्याऐवजी मंत्रिमंडळातील एखाद्या जबाबदार मंत्र्याने माफी मागितली तर जनेतेतील संताप कमी होईल अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *