मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे शिवसेना-भाजपा उमेदवारांच्या प्रचारातून गायब झाले आहेत. तसेच युतीच्या उमेदवारांच्या कोणत्याच फलक आणि जाहीरातीमध्ये त्यांचा फोटो वापरला जात नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
केंद्रात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. तसेच राज्यातही सत्तास्थानी असून या विधानसभेच्या निवडणूकीसाठीही युती आहे. भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांच्या जाहीरात आणि प्रचार फलकावर त्या त्या भागातील त्यांच्या पक्षाचे खासदार, ज्येष्ठ नेत्यांबरोबर मंत्र्यांचेही फोटो वापरण्यात येत आहे. याचबरोबर शिवसेनेच्या जाहीरात फलकावर अमित शाह आणि नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे वापरण्यात येत आहेत. मात्र भाजपाच्या उमेदवारांकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीच फक्त छायाचित्रे वापरण्यात येत आहेत. त्यामुळे युती असली तरी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी परस्पर पक्षाच्या खासदार-मंत्र्यांची छायाचित्रे न वापरण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे.

Marathi e-Batmya