मुंबईः प्रतिनिधी
भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला अंगावर घेणे भाजप खासदार किरीट सोमय्या यांना चांगलेच महागात पडले. शिवसेनेच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून यंदा विद्यमान खासदाराऐवजी नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यांचे नावही जाहीर करण्यात आले.
२०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत २५ वर्षे असलेली भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आली. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूका लढविल्या. त्यावेळी भाजप शिवसेनेकडून परस्परांवर आरोपही करण्यात आले. या दोन्ही निवडणूकीतील विजयानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना उद्देशून वांद्रेचा बॉस असा उल्लेखही अनेकवेळा केला. महानगरपालिकेच्या कारभारातील भ्रष्टाचारप्रकरणी सातत्याने आवाज उठविला. परंतु शिवसेनेकडून याप्रश्नी शांतता राखण्याचे धोरण स्विकारण्यात आले.
मागील साडे चारवर्षात भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडूनही या दोन्ही पक्षात अखेर युती झाली. मात्र सोमय्या यांनी केलेल्या सततच्या आरोपामुळे दुखावलेल्या शिवसेनेने याचा वचपा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ईशान्य मुंबईतून सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नाराजीला दूर करण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रयत्न केले. तसेच सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राऊत आणि ठाकरे यांच्याशी साधा संपर्कही त्यासाठी होवू शकला नाही.
Marathi e-Batmya