हिंमत होती तर जीनांवर गोळी झाडायची?, शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातायत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप आणि आव्हान

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज सुरुवातीला स्विकारले जातात आणि नंतर तेच अर्ज वेगवेगळी कारणे दाखवून रद्द करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज केला.

त्याचबरोबर गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता तर जिनाला गोळी मारली असती. गांधींना का गोळी मारली? पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील टीका केली. तसेच मागील दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशात शिवसेना उमेदवारांच्यासोबत घडत असलेल्या घटनांबद्दल त्यांनी वक्तव्य केले.

भाजपा शिवसेनेला घाबरते, म्हणून ते हे सगळं करताहेत. ही लोकशाही नाही, निवडणुका भीतीदायक नसाव्या, आमच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. भाजपाला आमच्या हिंदुत्वाची भीती आहे. पण आता ते जे करताहेत ते त्यांना भविष्यात नक्कीच महागात पडणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

आम्ही पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवतोय. पण आतापर्यंत आमच्या ५-६ उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आले आहेत. माझ्याकडे याचे पुरावे आहेत की ३ वाजेआधी अर्ज दाखल करण्यात आला होता, तरीही आमच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले. भाजपाचे अर्ज चुकासहीत स्वीकारले. गोव्यातही असाच प्रकार सुरू आहे. याप्रकरणी आम्ही दिल्लीत जाऊन निवडणूक आयुक्तांना भेटणार आहोत, नंतर पुढे काय करायचं ते ठरवू. आमच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू द्यायचा नाही, म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. युपीमध्ये शिवसेनेला मिळणाऱ्या पाठिंब्याची विरोधकांना भीती वाटतीये, अशी टीकाही त्यांनी केली.

आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती, असं म्हटलंय. यावर बोलताना राऊत म्हणाले, की गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता तर जिनाला गोळी मारली असती. गांधींना का गोळी मारली. पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिनांनी केली होती. जर गोळी मारणारा खरा हिंदुत्वावादी होता आणि त्याच्यात हिम्मत होती, तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती, नि:शस्त्र गांधींवर का गोळी झाडण्यात आली. गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते, परंतु त्यांच्यावर टीका होऊच शकत नाही, क्रांतीकारक म्हणून त्यांचं योगदान असामान्य होतं. कोणताही राष्ट्रभक्त गांधींवर कधीच गोळ्या झाडू शकत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

About Editor

Check Also

मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल- सुधीर जाधव पती पत्नीचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या – मनसे माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *