तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ पत्र देण्यासाठी दबाव आणला जात होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जमत नसेल तर आदित्य ठाकरे याने दिशा सालियन हिच्यावर बलात्कार केल्याचे शपथपत्र द्यावे असा दबाव आणत नाहीतर तुमच्या विरोधात ईडी लावू असा धाक दाखविला गेला. इतकेच नव्हे तर या दोघांच्या विरोधात शपथपत्र द्यायचे नसेल तर अजित पवार यांच्या विरोधात शपथपत्र देण्यासाठीही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विद्यमान गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणला होता असा गौप्यस्फोट अनिसचे मुख्य निमंत्रक श्याम मानव यांनी आज केला.
श्याम मानव पुढे बोलताना म्हणाले की, यापैकी कोणाच्याही विरोधात शपथपत्र दिल्यास अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीची कारवाई होणार नाही. जर अनिल देशमुख यांनी या पैकी एकाच्याही विरोधात तसे शपथपत्र जर दिले नाही तर ईडीची कारवाई अनिल देशमुख यांच्या विरोधात करण्यात येणार असल्याचा इशाराही काही जणांनी दिला होता असा दावा केला.
पुढे बोलताना श्याम मानव म्हणाले की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना १०० कोटींच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावं आणि आदित्य ठाकरे याने दिशा सालियन हिच्यावर बलात्कार आणि तिच्या हत्या प्रकरणात घ्यावं त्याचबरोबर अनिल परब याचे नाव त्यांच्याशी संबधित बेकायदेशीर व्यवहाराच्या प्रकरणात घ्यावं यासाठी काही जणांकडून सांगण्यात आलं. मात्र अनिल देशमुख यांनी अशी कोणतीही गोष्टी केली नसल्याचा दावाही यावेळी केला.
त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत, अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पार्थ पवारांच्या उपस्थिती गुटखा व्यावसायिकांकडून १०० कोटी रूपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा जबाब द्यावा यासाठी प्रयत्न केले. मात्र अनिल देशमुख यांनी अशा पध्दतीची कोणतीही गोष्टी करण्यास नकार दिला. त्यामुळे त्या लोकांनी अजित पवार यांना अडकवू शकत नसाल तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनिल परब यांची नाव घेऊन त्यांना अडकवा अशी नवी ऑफरही अनिल देशमुख यांना देण्यात आली होती असा दावाही श्याम मानव यांनी केला.
अनिल देशमुख यांनी या गोष्टी केल्या नाहीत म्हणूनच त्यांना १३ महिने तुरुंगात रहावं लागल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट करत संजय राऊत यांनाही अशाच पध्दतीने खोट्या प्रकरणात अडकविण्यात आल्याचा दावाही यावेळी केला.
श्याम मानव यांनी आणखी एक दावा केला की, अनिल देशमुख हे इतक्या दबावात होते की, आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत ते पोहचले होते. त्यातच अनिल देशमुख यांनी ज्या लोकांनी ठाकरे पिता-पुत्र, अजित पवार यांच्या विरोधात शपथपत्र दिले नाही. म्हणून देशमुख यांच्याच विरोधात मुंबई पोलिस आयुक्ताला १०० कोटी रूपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचे पत्र दिले. त्या आधारे एका नेत्याने अनिल देशमुख यांच्याकडे चार प्रतिज्ञा पत्र पाठवित त्यावर सही केल्यास ईडी चौकशीला सामोरे जावं लागणार नाही असा पर्याय देत तुरुंगातही जावं लागणार नाही असा पर्यायही यावेळी देण्यात आला होता. हा दबाव इतका होता की, अनिल देशमुख यांनी आत्महत्याच केली असती.
यासंदर्भात अनिल देशमुख यांना विचारले असता म्हणाले की, यासंदर्भात त्यांनी मला प्रतिज्ञापत्रक करून द्यायला सांगितली होती. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही. त्यामुळेच माझ्यामागे ईडी-सीबीआय लावून मला अटक करण्यात आली. तसेच श्याम मानव यांनी जो दावा केलाय तो योग्यच असून यासंदर्भातील माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असेही यावेळी स्पष्ट केले.
Marathi e-Batmya