Breaking News

लाडकी बहिण योजना आणि शेतकऱी कुटुंबासाठी राखीव निधीबाबत सरकारचा खुलासा लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला वर्गाची मता नजरेसमोर ठेवत आणि त्यांना खुष करण्यासाठी मुख्यंमत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने जाहिर केली. मात्र या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी लाभार्थ्यांना निधी वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच आदिवासी विभाग, समाज कल्याण विभागाचा निधी या योजनेसाठी वळविला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी राखीव असलेला निधीही या योजनेसाठी वळविण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय उघडकीस आल्यानंतर तातडीने आपला निर्णय फिरविण्याची वेळ राज्य सरकारवर आली. तसेच लाडकी बहिण योजनेसाठी कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुलासाही केला.

आतापर्यंत माझी लाडकी बहिण योजनेसाठी आदीवासी विभागाचे १३५०० कोटी रूपयांचा निधी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला राज्य सरकारकडून देण्यात येणारा १७ हजार कोटी रूपयांचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळविण्यात आला. त्याचबरोबर मागील काही आठवड्यांपासून माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना निधीची कमतरता जावू नय़े यासाठी साधारणतः १५ हजाराहून अधिक कोटी रूपयांचे कर्जरोखे राज्य सरकारकडून विक्रीस काढले.

तरीही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी निधी पुरेसा पडत नसल्याने अखेर राज्य सरकारने शेतकरी कुटुंबासाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळती करण्याचा निर्णय घेतला. तसेच यासंदर्भातील शासन निर्णयही राज्य सरकारकडून तीन सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला. मात्र त्या शासन निर्णयावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारने तो निर्णय फिरवत शेतकरी आत्महत्यांच्या बाबत त्यांच्या कुटुंबियाना देणयात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. तसेच लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याचे सांगत तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते असा खुलासा राज्य सरकारच्यावतीने मदत व पुर्नवसन विभागाने खुलाशांद्वारे केली.

तसेच पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे. याबाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला असल्याचेही मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाः- १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे.

या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दीष्ट आहे त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

नवी मुंबई येथे अर्ज भरतांना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *