मुंबईः प्रतिनिधी
अहमदनगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता असा खुलासा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
काँग्रेसच्या गांधी भवन येथे आय़ोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नगरच्या जागेवरुन हा सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला हे मुळात चुकीचे आहे. नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचा सलग तीनदा पराभव झाला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळाली तर आघाडीचा एक जागा वाढेल अशी माझी भुमिका होती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नगरच्या जागेवरुन सुरु असलेल्या संघर्षाबाबत स्पष्टीकरण दिले.
विखे म्हणाले, माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिला हे मुळात चुकीचे आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांसाठी वाटाघाटी सुरु होत्या. यामध्ये काही जागांबाबत आदलाबदलीचा राष्ट्रवादीचा आग्रह होता. यामागे आघाडीच्या ज्या जागा यापूर्वी निवडून आलेल्या नाहीत त्याबाबत ही चर्चा होती. या चर्चेमध्ये नगरची जागा होती.
नगरच्या निवडणुकीत सलग तीन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसला दिली तर ती निवडून येऊन आघाडीची एक जागा वाढेल अशी आमची भुमिका होती. याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत पुष्कळ चर्चा झाली, यामध्ये योग्य समन्वय घडवून आणायचा आमचा प्रयत्न होता. या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलाने वेगळ्या पक्षात जावं किंवा तसा निर्णय करावा अशी माझी भुमिका नव्हती. विरोधीपक्ष नेता या नात्याने आपल्याकडून चुकीचे विधान होऊ नये ही माझ्यावर जबाबदारी होती. त्यामुळे आघाडीला अडचण होऊ नये याची मी काळजी घेत होतो असा खुलासाही त्यांनी केला.
Marathi e-Batmya