Breaking News

सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार वेश बदलून का जात होते? एका बाजूला राष्ट्रवादीवर आरोप आणि दुसरीकडे अजित पवारांसोबत बोलणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नाव बदलून प्रवास करतात. अजित पवारांनी असे केले. उद्या एखादा अतिरेकी हेच उदाहरण घेऊन असे कृत्य करेल. हा पूर्णपणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. याबाबत मुंबई, दिल्ली विमानतळासह एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे. एअरलाईन्सने ज्यांना ओळखत नाही त्यांना प्रवासाची परवानगी कशी दिली? आम्हालाही आदर कार्ड दिले जाते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेही याबाबत उत्तर दिले पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्या एखादा अतिरेकी देशात आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुळात अजित पवार चोरून वेश बदलून का अमित शहा यांना भेटायला येत होते. त्यांच्यात असे नेमके काय शिजत होते? असा सवाल सुप्रियाताई सुळें यांनी केला आहे. विशेष म्हणजे अजित पवार त्यांच्यासोबत गेले त्याच्या केवळ पाच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी अजित पवारांवर आरोप केले. एकीकडे मोदी अजित पवारांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे अजित पवार अमित शहा यांची भेट घेत होते. नेगोशिएट करत होते. मग ना खाऊंगा ना खाने दुंगा कुठे गेलं? हे वॉशिंग मशीन नाही का? सगळे म्हणतात भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी झालेय. आता देवेंद्र फडणवीस आणि मोदीच याचं उत्तर देतील, असा टोलाही यावेळी लगावला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, जर शरद पवार यांना माहिती असतं, तर चोरुन जायची काही गरजच नव्हती. अजित पवार ताठ मानेने ऑफिशिअल बुकींग करुन विमानाने गेले असते. कोणी विचारलं, कशाला दिल्लीला चाललात. सहा जनपथ आहे. त्यांच्या काकांचं तर घर आहे, चोरी कसली. हे आपले संस्कार आहेत का? पुढची पिढी काय म्हणेल? त्यावेळी जे विरोधीपक्ष नेते होते, जे आज उपमुख्यमंत्री आहेत, ते नाव बदलून जातात, हे या महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आहे का? जिथे देशाचे गृहमंत्री नियम कायदे बनवतात, त्यांना भेटायलाच चुकीचं नाव लावून जाता, संविधानाच्या चौकटीत याला जागा नाही असे अशी टीकाही यावेळी केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *