मंदिर सुरु करण्याबाबत विनंत्या करण्यात येतायत… वाचा मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले याप्रश्नी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरचा आढावा घेताना सूचक वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत अनेक राजकिय पक्ष, संघटनांच्यावतीने विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत आणखी काही दिवस तरी राज्यातील मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सुतोवाच केला.

पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी वरील सूचक वक्तव्य केले.

पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब. मुंबई- ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे. कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका. इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करताहेत. आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाळा सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ असल्याचे त्यांनी सांगितले.

सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्य्यांवर लक्ष केंद्रित करा तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहायक यांच्या सहभागाने आपण संपूर्ण राज्यात घरोघर भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यात घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का ? त्यांचे आरोग्य कसे आहे? त्यांना न्युमोनियासदृश्य काही लक्षणे आहेत का? घरात बाहेरून कुणी व्यक्ती आल्या आहेत काय? मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का याविषयी पूर्ण माहिती विचारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात जन जागृती करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. सुविधा उभारण्यात मदत केली जाईल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा असे निर्देश त्यांनी दिले.

About Editor

Check Also

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी, नव्या संस्थेची स्थापना विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी MAHIMA संस्थेची स्थापना

जगभरातील विविध  देशातील रोजगारासंबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (Maharashtra …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *