नाना पटोलेंचा सवाल, मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हे का दाखल करत नाही? मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का ?

भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? असा सवाल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनच्या पायऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांच्यापासून महापुरुषांचा अपमान करण्याचे काम सुरु झाले आणि त्यानंतर भाजपा नेत्यांमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच लागली. भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापुरुषांनी भीक मागितली अशी भाषा वापरून त्यांची बदनामी केली, अपमान केला. सातत्याने महापुरुषांचा अपमान करूनही भारतीय जनता पक्षाने या वाचाळवीरांवर कारवाई केली नाही हे अत्यंत लाजीरवाणे आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरुच राहील.

महाविकास आघाडीचे सरकार असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. पण शिंदे फडणवीस सरकारने ते बंद करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस पुन्हा सुरु करावा अशी आमची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत पण सरकार शेतकरी आत्महत्या थांबवण्यात अपयशी ठरले आहे. कालही एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एका शेतकऱ्यांने पंतप्रधानांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली पण हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्री खोक्यांची भींत उभी करणार, कडेलोट करणार असे म्हणतात. राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का ? असा संतप्त सवालही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विचारला आहे.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *