विधानसभाध्यक्ष निवडणूकीत शिवसेना आणि शिंदे गटाकडून परस्पर विरोधी तक्रार व्हिप पाळला नाही म्हणून शिंदे गटाकडून १६ तर शिवसेनेकडून ३९ जणाविरोधात

नव्याने स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या दोन दिवसीय विशेष विधानसभा अधिवेशनात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ३९ आमदारांनी पक्षाच्या व्हिपच्या विरोधात मतदान केल्याची तक्रार केली. तर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी १६ आमदारांनी व्हिपच्या विरोधात मतदान केल्याची तक्रार करत परस्पर विरोधी दावे केले. त्यामुळे आगामी काळात नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेनेते बंडाळीचा झेंडा फडकावित एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चुल मांडली. त्यास भाजपाने पाठिंबा दिला. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशानुसार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. त्यानुसार आज विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काल उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करावे म्हणून व्हिप जारी केला.

तर दुसऱ्याबाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही व्हिप जारी केला. विधानसभा अध्यक्षासाठी प्रत्यक्ष मतदान करताना शिंदे गटाच्या ३९ जणांनी राहुल नार्वेकर यांच्याबाजून मतदान केले. तर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या १६ आमदारांनी राजन साळवी यांना मतदान केले. या गोष्टीची तातडीने दखल घेत शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी अध्यक्षाच्या आसानावर असलेले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या निदर्शनास ही बाब पत्र पाठवित आणून दिली. विशेष म्हणजे प्रभु यांनी पत्र दिल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्राची दखल घेतली म्हणून उपाध्यक्षांनी जाहिर करावे आणि ते पत्र वाचून दाखवावे अशी मागणी केली. त्यानुसार झिरवळ यांनी प्रभु यांनी दिलेले ३९ आमदारांच्या विरोधातील पत्र वाचून दाखविले.

तर निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने अध्यक्ष पदी विराजमान झालेले राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांनी दिलेले १६ आमदारांच्या विरोधातील पत्र वाचवून दाखविले.त्यामुळे आगामी काळात राहुल नार्वेकर हे नेमके एकनाथ शिंदे गटाचे पत्र ग्राह्य धरणार की उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पत्र ग्राह्य धरून कारवाई करणार याचे उत्तर भविष्यकाळातच मिळेल.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचा इशारा, अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी कडक पावले उचलणार

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतूकीवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *