राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या दोन सिंचन प्रकल्पांच्या खर्चास मान्यता म्हैसाळ उपसा सिंचन कार्यक्षमता निधी, जळगावातील लोंढे बँरेजच्या निधीस मान्यता

मागील अनेक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंचन प्रकल्पांच्या वाढीव निधीस मंजूरी देण्याचे प्रकल्प याही बैठकीत आणण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय जळगावातील लोंढे बँरेज प्रकल्पासाठीही १ हजार २७५ कोटी ७८ लाखांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या उपसा सिंचन योजनांच्या सुधारीत खर्चास मान्यता देण्यास मंजूरी या ही बैठकीत देण्यात आली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या

 सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता

कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे ३९८ दशलक्ष युनीट वीजेची गरज भागवली जाणार आहे.

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे. येथून विविध टप्प्यांमध्ये २३.४४ अघफू पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठे महांकाळ, तासगांव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाच्या मंजुरीवेळीच प्रकल्पांतर्गत पाणी उपसा करण्यासाठी लागणा-या उर्जा स्त्रोतांमध्ये सौर उर्जा वापराचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व अनुषंगिक अटी घातल्या होत्या. यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी लागणा-या विजेच्या वापरापोटी होणा-या खर्चात बचत होणार आहे. या ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन व सौर ऊर्जा प्रकल्प राबविणेसाठी भांडवल निधीसहाय्याच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानेही मान्यता दिली आहे.

योजनेचा वीज वापराचा खर्च कमी करणे व ग्रीन एनर्जी निर्मितीसाठी कायमस्वरुपी उपाय योजना म्हणून हा ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या करिता केएफडब्ल्यु जर्मन बँकेकडून १३० मिलियन युरो (अंदाजे १ हजार १२० कोटी) कर्ज स्वरूपात व ४७४ कोटी राज्य शासनाची गुंतवणूक अशा एकूण १ हजार ५९४ कोटी किंमतीच्या प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता दिली आहे.

या ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापनात म्हैसाळ योजनेतील एकूण १०८ पंपांपैकी ६५ पंप नवीन ऊर्जा कार्यक्षम पंप पद्धतीचे असतील. तसेच यात एपीएफसी व एससीएडीए- स्काडा यंत्रणा बसवणे व २०० मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणे, तयार झालेली वीज स्वतंत्र विद्युत वाहिनी द्वारे २२०/३३ के. व्ही नरवाड उपकेंद्रापर्यंत पुरवणे या कामांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र वीज नियामक आयोग, महावितरण, तसेच प्रकल्पाकरिता लागणा-या वीज खरेदी करार व अनुषांगिक कार्यवाही करिता मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील.

0000

जळगांव जिल्ह्यातील वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी

 १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद

जळगांव जिल्ह्यामधील वरखेडे लोंढे (बॅरेज) (ता. चाळीसगांव) या मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या सुधारित तरतूदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत गिरणा नदीवर मौजे वरखेडे बु. येथून दीड किलोमीटरवर आहे. या प्रकल्पाचा पाणीसाठा ३५.५८७ द.ल.घ.मी इतका असून, उपयुक्त पाणीसाठा ३४.७७२ दलघमी इतका असणार आहे. या बॅरेज प्रकल्पामुळे चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९०  हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पाच्या खर्चास आज मंत्रिमंडळ बैठकीत तिसरी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

About Editor

Check Also

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’

बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *