राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपाचे स्थानिक नेते राजू शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, लोकसभेची निवडणूक देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठीची होती. मात्र आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची असल्याचे सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सरकारचं ४०० पारचं खेचर महाराष्ट्रात आपण रोखलं आणि त्या खेचराला ४० जागांवरून त्यांना ९ जागांवर आणून ठेवलं. आपल्या विजयी खासदारांमध्ये छत्रपती संभाजी नगरचा खासदारचा समावेश नाही याचं शल्य मनात असल्याचं सांगत हे शल्य शिवसेना प्रमुखांनाही असणार असे सांगत या जागेवर आपली हार झाली हे वास्तव असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना एके शिवसेना हा ध्यास घेऊन असलेले चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव झाला तरी त्यांच्या निष्ठेचा मी नेहमीच आदर केला. हार-जीत होत असते. निवडणूकीमध्ये हरलो म्हणून आयुष्य संपत नसतं. मी लढणारा आहे. मी पुन्हा जिंकेन या इच्छेने मी पुन्हा संभाजी नगरमध्ये आलो आहे. लोकसभा निवडणूकीत काय झालं, कसं घडलं याचा विचार झाला पाहिजे, आता विधानसभेच्या निवडणूका येत आहेत. लोकसभेची लढाई राज्यघटना आणि लोकशाही वाचविण्यासाठीची होती. आता निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे. महाराष्ट्राची ओळख इतिहासात गद्दार, लाचार अशी लिहून ठेवायची नाही, त्यामुळे अशा गद्दारांचा लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नसल्याचेही यावेळी सांगितले.
महायुती सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या गळती सरकारचं हे शेवटंच अधिवेशन आहे. हे सरकार पुन्हा गादीवर बसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. निवडणूका नजरेसमोर ठेवून राज्यातील महिलांसाठी योजना जाहिर करत निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. गेल्या १० वर्षात मोदी सरकारने ज्या योजना जाहिर केल्या त्या योजनांची किती अंमलबजावणी केल्या असा सवाल करत एकाबाजूला म्हणायचं की वीज बिल माफ करू म्हणून दुसऱ्याबाजूला राज्यातील शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडून टाकायचं असा अजब कारभार या सरकारचा सुरु असल्याची टीकाही यावेळी केली.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, या सरकारकडून नुसता घोषणांचा सुकाळ करण्यात येत आहे. मात्र अंमलबजावणीबाबत या सरकारचा सगळा दु्ष्काळ असल्याची खोचक टीका करत शेतकऱ्याच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती करून दाखविली होती. मात्र तो माझा मुर्खपणा होता अशी खंतही यावेळी व्यक्त केली.
शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांनी चोरून लोकसभा निवडणूकीत विजय मिळवला आहे. आपला पक्ष चोरला, पक्षचिन्ह धनुष्यबाण चोरला त्यांनी मिळवलेला विजय चोरून मिळविलेला आहे. त्यामुळे त्यांचा विजय खरा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचंही असचं झालं. आपल्या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण चोरल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात तेच चिन्ह पोहचलं आहे. मशाल हे चिन्ह उशीरा लोकांपर्यंत पोहोचलं. आता या मशालीनंच यांची पाप जाळायची आहेत. हे विसरू नका असे सांगत गद्दार झालो तरी चालेल पण मी खुर्ची सोडणार नाही हे त्यांच धोरण असल्याचा आरोपही केला.
शिवसंकल्प मेळावा | प्रमुख मार्गदर्शक – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | सूर्या लॉन्स, सभागृह, छत्रपती संभाजीनगर – #LIVE https://t.co/PKKvFi7ctc
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 7, 2024
Marathi e-Batmya