उद्धव ठाकरे यांचा सवाल, रामदास आठवले, अजित पवार…..हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? उद्दाम आणि उर्मट भाजपाकडून महापुरुषांचा अपमान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्यावरून दिल्लीत सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याच संसदेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर मविआचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाच्या अमित शाह यांच्यावर टीका करत थेट भाजपाचे समर्थक असलेल्या रामदास आठवले, एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आदींना सवाल करत हा अपमान मान्य आहे का असा सवाल केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा उद्दाम आणि उर्मट नेत्याचा पक्ष आहे. या पक्षाच्या उर्मट नेत्यांकडून मागील अडीच तीन वर्षापासून महाराष्ट्रातील महापुरुषांचा आणि दैवतांचा अपमान करत आहेत. तो अपमान सहशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कोश्यारी नावाचे गृहस्थ जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी बसविले गेले होते तेव्हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. त्यांच्या लग्नाच्या वयावरून विचित्र टिपण्णी केली होती. छत्रपती शिवरायांचाही अपमान केला होता. त्यावेळी भाजपाने त्यांना माफी मागायला लावली नाही. त्यांना पदावरून दूर केलं नसल्याची आठवणही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावत म्हणाले, मध्यंतरी शिवाजी महाराजांचा पुतळा घाईत बसविण्यात आला. तो पुतळा आठ महिन्यात पडला, त्यानंतर काय घडलं ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्र हा गाडुंळाचा प्रदेश आहे असे भाजपाला वाटत आहे. महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जातय. अशात कहर झाला असून देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उर्मटपणाने ज्यांनी देशाला राज्यघटना दिली त्या महामानवाचा अपमान केला. त्यामुळे भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाचं ढोंग आता बाहेर आलं आहे. त्यांचा बुरखा फाटला आहे. हिंदूत्व म्हणजे मुह मे राम बगल मे छुरी असं यांच हिंदूत्व झालं आहे. यांना महाराष्ट्र संपवायचा असून आपल्या खेरीज दुसरं कोणी जन्माला आलाच नाही पाहिजे असं त्यांना दाखवून द्यायचं आहे. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच नाव घेऊन टिका करत होते. आता हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही बोलू लागले आहेत. एवढी यांची हिंमत वाढली आहे. भाजपाला पाठिंबा देणारे, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू काय करत आहेत, रामदास आठवले काय करत आहेत, आमचे मिंधे त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांना आणि अजित पवार यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मान्य आहे का असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संघाने आता खुलासा द्यावा की अमित शाह यांच्याकडून तुम्ही हे बोलून घेतलं आहे. अदाणीचं नाव घेतलं की भाजपा आभाळ कोसळावं तसं भाजपा कोसळतो, जो आरोप करतो त्यावर भाजपावाले लगेच टीका करायला लागतात. आम्ही जे लोकसभा निवडणूकी म्हणत होतं यांना राज्यघटना बदलायची आहे, आता संसदेतच राज्यघटनेबाबत चर्चा सुरु आहे. ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली त्यांच्याबाबत अमित शाह सारख्या माणूस इतक्या तुच्छतेने कसे बोलू शकतो असा सवाल करत यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी करत एकतर अमित शाह यांच्यावर कारवाई करावी किंवा मोदींची सत्ता सोडावी असे आव्हानही यावेळी पंतप्रधान मोदी यांना दिले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *