मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरु होते. तसेच या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही केल्या होत नव्हता. अखेर संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची तयारी सुरु झाली. त्यानुसार आज सकाळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला. या सगळ्या घडामोडींवर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत काल रात्री प्रसारमाध्यमातून बाहेर आलेले फोटो मागील दोन महिन्यापासून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होते का याचे उत्तर त्यांनीच द्यावे अशी मागणी केली.
विधान भवनात आज शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अर्थसंकल्पिय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी विधानभवनातील प्रसार माध्यमांशी बोलताना वरील सवाल केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तो त्यांच्या वैयक्तीक प्रकृती अस्वस्थतेमुळे असल्याचे सांगितले. तर अजित पवार म्हणतात धनंजय मुंडे यांनी नैतिकतेततून राजीनामा दिला. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा नेमका कशासाठी झाला असा सवालही यावेळी उपस्थित केला. तसेच ज्यावेळी जे काही फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले त्याचवेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे अशी मागणीही यावेळी केली.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय तर तो नेमका कशामुळे झाला काय कारणाने दिला ते कारण समोर आलं पाहिजे. जनतेच्या मनात यासंदर्भात असलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे. तसेच जनतेने जे काही बंद पुकारले आहेत. त्याचे जनप्रक्षोभात रूपांतर होऊ नये असे वाटत असेल तर सरकारने उपाय योजले पाहिजेत. हीच वेळ आहे महाराष्ट्रातून गुंडागर्दी हद्दपार करण्याची भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची नाहीतर लाडकी बहिण योजनेप्रमाणे लाडका गुंड ही नवी योजना सरकारने आणली पाहिजे असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावत महाराष्ट्र जास्त बदनाम होतोय हे जास्त क्लेशदायक असल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांच स्वागतच आहे. मात्र पारदर्शी कारभार करताना त्यांचे कोणी हात बांधत तर नाही ना हा देखील प्रश्न असल्याचे सांगत राज्यातील जनतेला या सगळ्याचा वीट आला आहे. जनतेला त्यांच्या समस्या सोडवणारं सरकार हवं आहे असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya