उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसांचा विजय, ५ जूलैला मोर्चा नाहीतर जल्लोष अहो अहवाल स्विकारला पण पान उघडायच्या आधीच सरकार पाडलं

आगामी ५ जूलै रोजी राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पक्षाच्या सहभागात राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेसंदर्भात घेतलेले निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, हा मराठी माणसांच्या एकजूटीचा विजय असल्याचे सांगत ५ जुलैला मोर्चा होणार नाहीतर जल्लोष होणार असून त्याच दिवशी जाहिर सभाही घेऊ असे जाहिर केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारचे दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, ५ जुलै रोजी मोर्चा जरी होणार नसला तरी जल्लोष की जाहिर सभा घेण्यासंदर्भात आम्ही इतरांशी बोलत आहोत. त्यानुसार पुढील निर्णय घेऊ, पण ५ जुलै रोजी जाहिर कार्यक्रमच घेणार असल्याचे सांगितले.

डॉ माशेलकर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉ माशेलकर समितीची स्थापना ही काय शाळेसाठी करण्यात आली नव्हती. त्या समितीचा अहवाल मी मुख्यमंत्री असताना सादर केला होता. परंतु त्या अहवालाचे पान उघडण्या आधीच आमचे सरकार मिंद्याने पाडले. त्यामुळे त्या अहवालाच्या संदर्भात निर्णय मी घेतला नाही. त्यासंदर्भातील निर्णय नंतरच्या सरकारने घेतला असल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मिध्यांना या संदर्भात निर्णयाची माहिती आहे. पण ते त्या निर्णयाबाबत का बोलत नाहीत असा सवाल करत त्याचा राजकिय जन्मच आमच्यातून झालेला असल्याने त्याची सर्व अंडी पिली आम्हाला माहित आहेत असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, परंतु येत्या पाच जुलै रोजी जल्लोष किंवा जाहिर सभा घेण्यात येणार आहे. हा मराठी माणसांच्या एकजूटीचा विजय असून हे आलेले संकट सर्व मराठी माणसांच्या एकजूटीने रस्त्यातूनच परत पाठवले. पण आता जागा झालेल्या मराठी माणसाने आता असेच जागृत राहिले पाहिजे. तरच भाजपाच्या षडयंत्र उलटवून लावू शकू. अन्यथा आता हिंदीचे संकट आले म्हणून ते परत पाठवले आता काय पुन्हा झोपू असे मराठी माणसाने करू नये. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. पण मराठी भाषेवर हिंदी भाषा लादण्याच्या विरोधात आम्ही असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *