निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवत असते. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजपा द्वेषाचे विष कालवत आहे. भाजपाच्या कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है, अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, फसोगे तो लुटोगे, असे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण भाजपा महायुतीच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, सर्वत्र रस्ते खड्डेमय झाले आहेत, लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही, शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, मुंबईकरांच्या हक्काच्या जागा आपल्या लाडक्या बिल्डर आणि उद्योगपती मित्रांना कवडीमोल भावाने देण्याचा सपाटा या मित्रजीवी सरकारने लावला आहे. शहरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न आहे. मोनो आजही बंद आहे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे ११ वर्षापासून सरकार आहे तर राज्यातही भाजपाचेच सरकार आहे तरिही मुंबईत विकासाच्या नावाने बोंब आहे. भाजपा महायुती सरकारने मुंबई बकाल केली आहे. मुंबईकरांना भेडसावत असलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे भाजपा महायुती देणार की नाही? असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईकरांनी भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडू नये, भाजपाच्या भूलथापांना बळी पडाल तर आपली मुंबई लुटली जाईल हे लक्षात असू द्या. यावेळी मुंबईकर म्हणून एकजूट होऊन आपल्या मुंबईला दरोडेखोर भाजपापासून वाचवूया आणि मुंबई महानगरपालिकेत बदल घडवूया असे आवाहनही यावेळी केले.
Marathi e-Batmya