सोनिया गांधीजी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाने प्रकाशनानंतर अवघ्या एका आठवड्यात विक्रीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम म्हणजे त्यांच्या विचारांना वाचकांनी दिलेली जागतिक पोचपावती आहे. त्याग, संयम, सहनशीलता, धैर्य, देशाप्रती निष्ठा आणि आपल्या विचारांशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहण्याची वृत्ती असलेल्या सोनियाजी गांधी यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी व्यापक वैचारिक दृष्टिकोन आणि बौद्धिक परिपक्वता असणे आवश्यक आहे पण ती शिंदेसेनेकडे नाही. पुस्तक फाडून विचार व इतिहास पुसता येत नाही असे घणाघाती टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तीव्र निषेध करत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्य सेनेच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या चेहऱ्यांकडे पाहिले तर त्यांच्याकडे ना वैचारिक बांधिलकी दिसते, ना पक्षनिष्ठा आणि ना जनतेप्रती कोणतीही आत्मीयता, अशा लोकांकडून सोनिया गांधीजी यांचे पुस्तक समजून घेण्याची किंवा त्यातील विचारांची खोली जाणून घेण्याची अपेक्षा करणेच मुळात चुकीचे आहे. कारण त्या पुस्तकाचा आशय आणि त्यामागील विचार त्यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहेत.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पत्रकार परिषदेत शायना एन.सी. यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडला, हा केवळ एका छायाचित्राचा अपमान नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि बाळासाहेबांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा अपमान आहे. पुस्तक फाडून विचार संपवता येत नाहीत आणि छायाचित्र फाडून इतिहास पुसता येत नाही. महाराष्ट्र हे कदापि विसरणार नाही आणि माफही करणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya