विजय वडेट्टीवार यांचा इशारा, संविधान बदलण्याचा प्रयत्न कराल तर सत्ता बदलली जाईल संविधानाची पायमल्ली केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे

भारत या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत, आपली कर्तव्य काय आहे हे आपल्याला संविधानाने शिकवले. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा म्हणून सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ संविधान आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर महात्मा गांधी यांनी सुचवले होते, देशाच्या संविधान बनवण्याची जबाबदारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात यावी. सगळ्यात जास्त पदवी घेतलेले आणि विद्वान असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे प्रमुख बनले असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आपल्या संविधानाचा पायाच संतांच्या शिकवणूकीतून आला आहे. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता, आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी आत्मोन्नती आणि विवेकवादाचा पुरस्कार केला. संविधानाच्या कलम १९ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य यांना मान्यता दिली. संत जनाबाई आणि संत बहिणाबाई यांनी महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार केला. याचेही प्रतिबिंब संविधानात आहे असेही यावेळी सांगितले.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, मराठी साहित्य संलेनाच्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी आपल्या भाषणात पुरोगामी महाराष्ट्र आणि संत परंपरेची आठवण करून दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये पुरोगामी विचारसरणीतून निष्पन्न झालेली आहेत. आणि तेच संविधानात दिसते. फुरोगामी म्हणून हेटाळणी करणाऱ्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी सत्य बोलून दाखवले, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पण आता मात्र संविधानाची पायमल्ली केली जात आहे. महाराष्ट्रात याची सुरुवात एका राज्यपालानी केली. राज्यातील सर्वोच्च पदावर बसून त्यांनी राजकीय निर्णय घेतले, राजकीय वक्तव्यं केली. या राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्याबाबत अश्लाघ्य वक्तव्य केले. यानंतर दोन पक्ष फोडून महायुती सरकार आले, या प्रकरणी तीन वर्ष झाले तरी कोर्टात निकाल आलेला नाही असा मुद्दाही यावेळी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, संविधानात अनेक मूलभूत तत्व आहेत त्यातील मूलभूत तत्व म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव. बाबासाहेबांनी राजकारण आणि धर्म वेगळा रहावा यावर जोर दिला. त्यानुसार सरकार आणि सरकारी यंत्रणांनी सर्वांशी समान वागणे अपेक्षित आहे, पण आपल्या राज्यात संविधानाची शपथ घेऊन एका समाजा विरोधात सतत द्वेषपूर्ण विधान करत आहे. हे संविधानाला छेद देणारे आहे अशी टीकाही केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात आज कोणत्याही महापालिकेत लोकनियुक्त शासन नाही, लोकप्रतिनिधी नाही, निवडणुका होत नाही ही संविधानाची पायमल्ली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या देठाला ही हात लावू नये, शत्रूच्याही निष्पाप स्त्रीचा सन्मान करावा हे शिकवले. त्याचवेळी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला आणि मृत्यूनंतर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच आहे ही देखील छत्रपतींची शिकवण आहे असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ती कबर महाराष्ट्राच्या शौर्याची, लढाऊ बाण्याची खूण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे बीज पेरले ती कबर त्याची अभिव्यक्ती आहे. जी कबर मराठी बाण्याचे प्रतीक आहे, ते थडगे तोडून तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाचा,संघर्षाचा इतिहास पुसायचा आहे का? असा सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण सध्या मात्र द्वेषाच्या वातावरणात संविधानाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संविधानाला बदलता येणार नाही, जे असा प्रयत्न करतील त्यांची सत्ता बदलली जाईल, असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *