विजय वडेट्टीवार यांची टीका, अभिभाषणात जुन्याच मुद्याची घासून पूसून उजळणी राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक

राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात  जुन्याच  मुद्द्यांची घासून-पुसून  उजळणी केली असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी  जळजळीत  टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते  विजय वडेट्टीवार यांनी  बुधवारी विधानसभेत केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर तोफ डागली राज्यपालांनी अभिभाषणात सरकारच्या २०४७ च्या ‘व्हिजन’चे चित्र रंगवले. वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करणार असे  हेच सरकार सांगत होते. त्याचा विसर पडलेले सरकार आता थेट ५ ट्रिलियनची भाषा करत आहे.  एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे  काय झाले  हेच ठाऊक नसताना  २०२६ मध्ये २०४७ ची भाषा करणे संयुक्तिक आहे का? असा सवाल केला.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्यातील २ हजार २०० शाळांमध्ये शिक्षक नाहीत.  मराठी शाळा बंद पडत आहेत. कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी  रुपये खर्च करणाऱ्या सरकारने हा खर्च  दोन हजार कोटीने कमी करावा आणि तो पैसा  शिक्षणासाठी दद्यावा, अशी मागणी  वडेट्टीवार यांनी केली. सरकारमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. औषध बनवणाऱ्या कंपन्यांना ‘दप्तर’ बनवण्याचे कंत्राट देऊन मर्जीतील लोकांचे खिसे भरले जात आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या  शेजारील जमीन आणि नागपूर वनविभागाची वन्यप्राणी अधिवासाची जमीन उद्योगपतींच्या घशात घातली जात आहे. १० कोटी वृक्ष लावण्याच्या गप्पा मारणारे सरकार जंगले साफ करत आहे,  असा आरोपही यावेळी केला.

शेवटी विजय वडेट्टीवार म्हणाले की, दावोसमध्ये जाऊन केलेले गुंतवणूक  करार म्हणजे निव्वळ आकड्यांची फुगावट  आहे. देशातील आणि राज्यातील  कंपन्यांशी तिकडे जाऊन करार करण्याचे काय प्रयोजन? दरवर्षी दावोस मधील गुंतवणूक आणि रोजगाराचे आकडे वाढत आहेत.  पण प्रत्यक्षात यातून किती रोजगार मिळाला, याची श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणीही यावेळी  केली.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची माहिती, राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा

राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *