मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात ? काहीजण खुलासा करतायत विनोद तावडे मुरलीधर मोहोळ, रविंद्र चव्हाण आणि देवयांनी फरांदे यांच्या नावाची चर्चा

राज्यातील संशयातीत बहुमताचा आकडा पार केलेल्या भाजपा आणि महायुतीत सध्या मुख्यमंत्री पदावरून सध्या संघर्ष चांगलाच पेटलेला दिसून येत आहे. एकाबाजूला सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य करणार असल्याचा खुलासा केलेला असला तरी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचा मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरुच आहे. मुख्यमंत्री पदाबरोबर भाजपाकडे असलेली महत्वाची खात्यावर शिंदे यांनी केला आहे. त्यातच भाजपाकडून राज्यात फारसा परिचित नसलेले चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रणनीतीचा भाग म्हणून भाजपाकडून अनेकांची नावे पुढे करण्यात आली. मात्र यातील अनेकांनी आपण दिल्लीच्या संपर्कात किंवा दिल्लीला गेलो नसल्याचे सांगत मुख्यमंत्री पदावरून खुलासा करत आहेत. दुसऱ्याबाजूला याच आमदारांकडून तिरक्या डोळ्याने मुख्यमंत्री पदावर नजर ठेवली आहे.

भाजपाकडून आतापर्यंत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र विनोद तावडे यांचे नालासोपारा येथे पाच कोटी रूपयांचे वाटप करण्याच्या गदारोळानंतर त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर पुण्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे करण्यात आले. परंतु त्यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचा खुलासा शनिवारी करत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण आणि नाशिकच्या आमदार देवयांनी फरांदे यांचे नाव पुढे आले. याशिवाय ओबीसी चेहरा म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव सध्या भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत ठेवण्यात आले आहे.

या वाढत्या चेहऱ्यांच्या पार्वभूमीवर मुख्यमंत्री पदावरून शिंदे-फडणवीस यांच्यातील सुप्त संघर्षात आपले मरण व्हायला नको म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत आपण मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीच्या संपर्कात नसल्याचे किंवा दिल्लीहून कोणाचाही फोन आला नसल्याचे खुलासे करण्यात आले.

मात्र यातील चंद्रशेखर बावनकुळे, देवयांनी फरांदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक विनोद तावडे यांच्याकडूनही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे अद्याप स्पष्ट केले नाही. तर दुसऱ्याबाजूला देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत राहिल याची काळजी फडणवीस यांच्या कॅम्पकडून घेतली जात आहे. परंतु दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला फारसा प्रतिसाद नसल्याचे भाजपामधील अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक तर मराठा असावा किंवा ओबीसी चेहऱ्याचा असावा अशी रणनीती भाजपामधील वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येत आहे. त्यादृष्टीनेच भाजपाकडूनच अनेक चेहरे पुढे आणले जात आहेत.

जर या नावांपैकी मराठा आणि ओबीसी चेहरा नको असेल तर महिला आमदार पुढे करण्याची रणनीती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. यातून संघाच्या मुशीची पार्श्वभूमी असलेल्या महिलेला प्राधान्य देण्याचा विचार भाजपाकडून करण्यात येत आहे.

काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतील मंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा असल्याचे जाहिर केले. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत नाव केंद्रातील निरिक्षक मुंबईत आल्यानंतर निर्णय करणार असल्याचे स्पष्ट केले. तर महायुतीच्या नेत्यांची बैठक अमित शाह यांच्या निवासस्थानी झाल्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री पदाचे नाव जाहिर करणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविण्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक संशयातीत बहुमत मिळवूनही जाहिर करण्यात अडचण होत असेल तर मुख्यमंत्री पदा पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे चालून तर जाणार नाही ना अशी चर्चा ही आता भाजपामध्ये रंगत चालली आहे.

About Editor

Check Also

योगेश कदम यांची माहिती, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ‘विशेष कृतीदल’ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *