योगेश कदम यांची माहिती, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ‘विशेष कृतीदल’ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढले आहेत. बांग्लादेशी घुसखोरांमुळे मुंबईच्या पारंपारिक व्यवसायांवर आणि सुरक्षेवर गदा येत आहे. बांग्लादेशी घुसखोर स्थानिक हिंदूंना त्यांच्याच घरातून बाहेर काढत आहेत. हा विषय अत्यंत ज्वलंत असून मुंबईसह राज्याला बांग्लादेशी मुक्त करण्यासाठी शासन आता कठोर पावले उचलणार का ? अशा प्रश्नांचा भडिमार करून विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी सरकारला धारेवर धरले.

त्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी लवकरच ‘विशेष कृतीदल’ स्थापन करण्यात येईल, तसेच ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून घुसखोरांना शोधून काढले जाईल, असे आश्वासन विधान परिषदेत दिले.

मुंबईतील वाढती घुसखोरी आणि त्यामुळे निर्माण झालेला सुरक्षेच्या गंभीर प्रश्ना विषयीची लक्षवेधी विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी मांडली. या वेळी त्यांनी मुंबईच्या सुरक्षेविषयी आणि हिंदूंच्या हक्काविषयी सरकारचे लक्ष वेधले.

घुसखोरांचा ‘लॅण्ड जिहाद’ आणि वाढती असुरक्षितता ! 

प्रविण दरेकर म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन सूचीमध्ये घुसखोर मोठ्या संख्येने शिरत आहेत. २३७ बांगलादेशींना जन्मदाखले कसे मिळाले ?, तसेच डोंगरी किल्ला, मालवणी, चेंबूर यांसारख्या भागांत बांगलीदेशी घुसखोरांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. विशिष्ट समुदायाची लोकसंख्या वाढवून मुंबईचे वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. बांगलादेशी घुसखोरांनी फेरीवाला व्यवसायातून सार्वजनिक जागा, पदपथ, बाजारपेठा कब्जात घेतल्या आहेत. ‘हॉकर्स जिहाद’चे प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात वाढू लागले आहे.भाजी मंडई, मासळी बाजार, दूध वितरण, फळ विक्रेते, पदपथावरील लघुउद्योग, छोटे उपाहारगृहे, किराणा दुकाने, चांभार, लोहार, कुंभार, सुतार, हावी, शिंपी यासारखे अनेक पारंपरिक व्यवसाय करणारे बहुसंख्य हिंदू यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

मुंबई येथील समुद्र किनारपट्टीवर बांगलादेशी मुसलमानांच्या वस्त्या उभारल्या आहेत. दक्षिण मुंबई येथे कोस्टल लाईनवर अवैध छोटे मोठे दर्गे बांधण्यात आले आहेत. आजूबाजूला बांग्लादेशी घुसखोरांच्या झोपडपट्ट्या बसवण्यात आल्या आहेत. या दर्ग्यांचा वापर अवैध घुसखोर मुंबई येथे स्थिरस्थावर करण्यासाठी केला जात आहे, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गोवंडी येथून पकडलेले ८ किन्नर हे बांगलादेशी घुसखोर होते. अनेक बांग्लादेशी घुसखोरांकडून बनावट जन्मप्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शिधापत्रिका जप्त करण्यात आली आहेत. परिणामी अशा घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून त्यांच्यामध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे बांग्लादेशी घुसखोरांना पकडण्याची मोहीम तीव्र करावी, अशी मागणी केली.

यावेळी सदस्य शशिकांत शिंदे म्हणाले की, राजकीय आशीर्वादाशिवाय हे घुसखोर पदपथवर धंदा करू शकत नाहीत. मतांच्या राजकारणासाठी ही यंत्रणा पोखरली गेली आहे. अनधिकृत वस्त्यांवर बुलडोझर चालवून त्यांना कायमचे बाहेर काढावे अशी मागणी केली.
राजकीय आरोप नको, घुसखोर मुक्त शहर करा ! – अनिल परब
शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब म्हणाले की, हा केवळ सुरक्षेचा प्रश्न आहे. झोपडपट्ट्यांमध्ये चालणारे कपड्यांचे कारखाने आणि अनधिकृत वस्त्यांमध्ये बांग्लादेशी घुसखोर ठाण मांडून बसले आहेत. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता खर्‍या अर्थाने कारवाई करावी अशी मागणी केली.

About Editor

Check Also

शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती, मुंबई-गोवा महामार्गाचे काम नव्या एजन्सीला दिले विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान दिली माहिती

मुंबई–गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली असून माणगाव व इंदापूर बायपासची कामे युद्धपातळीवर सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *