मुंबई: विशेष प्रतिनिधी
काही दिवसांवर राज्यात गणेशोत्सव आलेला आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा संभावित धोका लक्षात घेवून राज्य सरकारने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने नियमावली जाहीर केली. ती खालीलप्रमाणे…
१) महापालिकेच्या धोरणानुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक.
२) उच्च न्यायालयाच्या निर्णयामप्रमाणे आणि स्थानिक प्रशासन अर्थात महापालिकेच्या धोरणानुसार मंडपाचे यथोचित धोरणानुसार उभारणी करणे आवश्यक आहे. तसेच घरगुती किंवा सार्वजनिक मंडळाने भपकेबाज सजावट करणे टाळावे.
३) सार्वजनिक उत्सव मंडळासाठी ४ फुटाची गणेश मुर्ती तर घरगुती उत्सवासाठी २ फूट उंचीची मुर्ती प्रतिष्ठापना करण्यास परवानगी देण्यात आली.
४) गणेशमुर्तीऐवजी शक्यतो धातू किंवा संगमरवरची आदी मुर्तीचे पुजन घरी करावे. तसेच शक्यतो पर्यावरण पुरक आणि शाडूच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. तसेच त्याचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. घरी तशी व्यवस्था नसेल तर नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी जाऊन त्याचे विसर्जन करावे. त्याचबरोबर गणेशमुर्जीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असेल तर त्याचे विसर्जन माघी गणपतीत करावे. याशिवाय आमगन आणि विसर्जनावेळी गर्दी करणे टाळावे असे आवाहनही राज्य सरकारने केले.
५) उत्सवाकरिता स्वच्छेने देणगी दिल्यास त्याचा स्विकार करावा. तसेच मंडपात जाहीराती पाहून गर्दी होईल अशा गोष्टी टाळाव्यात. तसेच आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जा्हीरातींना प्राधान्य द्यावे.
६) सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक शिबीरे, उपक्रम उदा. रक्तदान शिबीरे आदी गोष्टींना प्राधान्य द्यावे. डेंग्यु-मलेरिया, कोरोना इ. आजारांबाबत जनजागृती आणि स्वच्छतेवर भर द्यावा.
७)आरती, भजन, किर्तन आदी कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणाबाबतचे नियमांचे पालन करावे.
८) श्रीगणेशाच्या दर्शनाचे स्थानिक केबल, ऑनलाईन सुविधा, वेबसाईट, फेसबुक आदींच्या मार्फत उपलब्ध करून द्यावे.
९)गणपती मंडपामध्ये थर्मल स्क्रिनिंग आणि निर्जंतुकिकरणाची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येवून दर्शन घेवू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शाररीक अंतर, मास्क, सॅनिटायझरचे नियम आणि स्वच्छता आदींवर भर द्यावा.
१०) आगमन आणि विसर्जनाच्या शक्यतो मिरवणूका काढू नये. पारंपारीत पध्दतीने विसर्जनावेळी करण्यात येणारी आरती शक्यतो कमीतकमी वेळेत घरीच करावी. लहान मुले, वरिष्ठ नागरिक यांनी सुरक्षेच्या कारणास्तव जाणे टाळावे. चाळीतील, इमारतीतील आणि घरगुती गणेशमुर्ती विसर्जनाची मिरवणूक एकदम काढणे टाळावे.
११) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था इत्यांदींनी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी.
१२) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने शासनाच्या मदत व पुर्नवसन, पोलिस, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय व शिक्षण विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. याशिवाय अन्य सूचनाही जारी केल्यास त्याचे पालन करावे असे आवाहन करत या सूचना पाळणे बंधनकारक असल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.


Marathi e-Batmya