बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तथा पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा हिंदूस्तान अर्थात भारत आता “लिंचिस्तान” (लिंचिंगची भूमी) बनत चालला असल्याचे मत व्यक्त करत केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली.
मेहबूबा मुफ्ती पुढे बोलताना म्हणाल्या की, बांग्लादेशात आपल्या काही हिंदू बांधवांची हत्या झाली आणि देशभरात एकच गोंधळ उडाला. पण जेव्हा आपल्याच देशात लिंचिंग होते, तेव्हा कोणीही आवाज उठवत नसल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, देशातील सध्याचे वातावरण अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. तुम्ही पाहिले की बांग्लादेशात आपल्या काही हिंदू बांधवांची हत्या झाली, तेव्हा देशभरात कसा संताप निर्माण झाला होता. पण जेव्हा आपल्या देशात लिंचिंग होत होते, तेव्हा अखलाख प्रकरणापासून, जे अजूनही संपलेले नाही, तेव्हा कोणीही बोलत नाही. कालच ओडिशामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली; त्याचे कान कापण्यात आले आणि त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. यामुळे लोकांचे जीवन कठीण होत आहेच, शिवाय देशाच्या धर्मनिरपेक्ष रचनेचाही नाश होत असल्याबाबतही चिंता व्यक्त केली.
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या, महात्मा गांधींनी ज्या देशाची कल्पना केली होती तो देश ‘लिंचिस्तान’ बनत आहे. गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी बांधलेला देश आता गोडसेच्या देशात बदलत आहे. आम्हाला धर्मनिरपेक्षता अबाधित राहावी अशी आमची इच्छा आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम नेहमीप्रमाणेच एकत्र राहतात. जम्मू आणि काश्मीर हे या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम शांततेने एकत्र राहत आहेत असेही यावेळी सांगितले.
२०१९ नंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, लोक स्वतःला मुक्तपणे व्यक्त करू शकत नाहीत आणि तरुणांना गुदमरल्यासारखे वाटत आहे.
आरक्षणावरील निषेधाचा संदर्भ देताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेण्यात आले आहे. “आम्हाला हे मुद्दे उपस्थित करायचे आहेत आणि लोकांना स्वतःला मुक्तपणे व्यक्त करता येईल असे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे,” असेही यावेळी सांगितले.
आर्थिक चिंता अधोरेखित करताना मेहबूबा मुफ्ती इशारा देत म्हणाल्या की, अमेरिका आणि चिलीसारख्या देशांमधून स्वस्त सफरचंद आयातीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील फळ उद्योग गंभीर धोक्यात आहे. “जर हे असेच चालू राहिले तर जम्मू आणि काश्मीरचा संपूर्ण फळ उद्योग कोसळेल, असेही त्या म्हणाल्या.
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, पर्यटनात झपाट्याने घट झाली आहे, ज्यामुळे अनेक तरुणांना रोजगार नाहीसा झाला आहे. आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे खुल्या गुणवत्ता श्रेणीतील लोकांनाही गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आमचे तरुण राज्याबाहेरील तुरुंगात आहेत, ज्यांच्यासाठी मी जनहित याचिका दाखल केली. आमच्या समस्या वाढत आहेत, कमी होत नसल्याचे सांगितले.
मेहबूबा मुफ्ती यांनी वीज बिल आणि वाढत्या महागाईबद्दलही चिंता व्यक्त केली आणि म्हणाल्या की, लोक उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत. अनेकांना पासपोर्ट मिळू शकत नाहीत. म्हणूनच आम्ही हे व्यासपीठ तयार केले आहे, जेणेकरून लोक त्यांच्या चिंता व्यक्त करू शकतील. आम्ही हे मुद्दे नॅशनल कॉन्फरन्स सरकार, केंद्र सरकार किंवा प्रशासनाकडे नेऊ जेणेकरून उपाय शोधता येतील, असेही म्हणाल्या.
शांततापूर्ण निदर्शनांवर निर्बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जर एखाद्याला शांततेत निदर्शने करायची असतील तर त्यांना का रोखले जाते? आज इल्तिजा यांना थांबवण्यात आले, वाहीद पारा यांना थांबवण्यात आले आणि आगा रुहुल्ला यांना थांबवण्यात आले. सरकारने तरुणांना पुन्हा प्रेशर-कुकर परिस्थितीत ढकलू नये. जेव्हा ते फुटते तेव्हा सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो असेही यावेळी म्हणाल्या.
पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ‘कथ बाथ’ (संभाषण) नावाचा एक नवीन जनसंपर्क उपक्रम सुरू केला आहे. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पीडीपी नेते लोकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात. आतापर्यंत, हा उपक्रम श्रीनगर, जम्मू आणि अनंतनाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
Marathi e-Batmya