“हौस पुरवा महाराज, मला आणा एक १५ लाखाची गाडी” दोन महिन्यासाठी मंत्रीपद मिळूनही मंत्र्यांचा नव्या गाडीसाठी अट्टाहास

मुंबईः प्रतिनिधी
साधारणतः दोन महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत १३ नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला. मात्र या सर्वच मंत्र्यांना अवघा दोन महिन्याचा कालावधी मिळणार असताना यातील काही मंत्र्यांनी नव्या चारचाकी वाहनासाठी आपल्याच विभागाकडे हट्ट धरल्याची माहिती नुकतीच पुढे आली.
मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कँबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश महेता यांना डच्चू दिला. तर राज्यमंत्री असलेल्या दिलीप कांबळे, प्रविण पोटे-पाटील, राजे अंबरीश आत्राम यांना नारळ दिला. मात्र मंत्रिमंडळात नव्याने समावेश करताना १३ जणांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे ऐनवेळी गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि संबधित विभागाची चांगलीच धावपळ झाल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
त्यामुळे अखेर या सर्वच नव्या मंत्र्यांसाठी 15 लाख रूपये किंमतीची नवी इनोव्हा क्रिस्टा ही गाडी घेण्याचे आदेश मंत्र्यांनी संबधित विभागांना दिले. त्यामुळे कामगार विभाग, कृषी विभाग यांच्यासह अन्य काही विभागांनी इनोव्हा क्रिस्टा या गाडीची बुकींग केली असून या गाडीच्या डिलीव्हरीसाठी ९० दिवसाचा कालावधी लागणार असला तरी या मंत्र्यांची थांबण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या नव्या गाडीच्या येण्याला ९० दिवसाचा कालावधी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात या मंत्र्यांना भाड्याने गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नवे मंत्री म्हणून जरी आले असले तरी या मंत्र्यांना नवीन गाडी हवी आहे. राहीलेल्या दोन महिन्यात त्यांना किती काम करायला वेळ मिळणार आहे, ते देवच जाणो मात्र मंत्र्यांची मागणी पूर्ण करणे विभागाचे काम असल्याचे मत गाडीसाठी बुकींग करणाऱ्या दोन-तीन विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची मुंबईत भेट भारत-फ्रान्स व्यावसायिक संबध वृद्धींगत करण्याच्या अनुषंगाने चर्चा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१६ फेब्रुवारी २०२६) मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *